राष्ट्रवादी आक्रमक; कॉँग्रेसचे ‘वेट अँण्ड वॉच’!
By Admin | Updated: August 22, 2014 00:25 IST2014-08-22T00:02:30+5:302014-08-22T00:25:36+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाबाबतची चर्चा सुरू असतानाच अकोला जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी आक्रमक; कॉँग्रेसचे ‘वेट अँण्ड वॉच’!
अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाबाबतची चर्चा सुरू असतानाच अकोला जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीकडून पाचही मतदारसंघातील ४९ इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसने मात्र राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. जागा वाटपाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेत असताना काँग्रेसने ह्यवेट अँण्ड वॉचह्णची भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या घोषणेनंतर जागा वाटपाबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात. वाढीव जागांची मागणी करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रश्न ताणून धरल्यामुळे आतापर्यंतच्या चर्चा निष्पळ ठरल्यात. त्यामुळे २१ ऑगस्टची जागा वाटपच्या चर्चेसाठी बोलावलेली बैठक २४ पर्यंंत पुढे ढकलण्यात आली. राज्य पातळीवर चर्चेची गुर्हाळे सुरू असताना अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत पाचही मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले. पाचही मतदारसंघातून अर्ज स्वीकारण्यासाठीची मुदतसुद्धा त्यासाठी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली होती. २१ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. अर्जांंसह यादी प्रदेशाध्यक्षांकडे रवाना करण्यात आली आहे. एकीकडे काँग्रेसने जिल्ह्यातील मूर्तिजापूर वगळता त्यांच्या वाट्याला आलेल्या इतर चार मतदारसंघातील इच्छुकांच्याच मुलाखती १७ ऑगस्ट रोजी मुंबईत घेतल्यात. असे असतानाही राष्ट्रवादीने २७ ऑगस्ट रोजी होणार्या मुलाखतीसाठी पाचही मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज स्वीकारून काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.