एरंडीसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घेतली दखल
By Admin | Updated: March 9, 2015 01:42 IST2015-03-09T01:42:49+5:302015-03-09T01:42:49+5:30
राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना नोटीस.

एरंडीसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घेतली दखल
बुलडाणा : होळी करण्याच्या जुन्या प्रथेतून जैवविविधतेचा महत्वाचा भाग असलेल्या एरंडीच्या झाडांनाच आपण नष्ट करतोय का ? अशी विचारणा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने राज्य शासनाच्या जैवविविधता मंडळाकडे ६ मार्च रोजी (स्टेट बायो-डायव्हरसिटी बोर्ड) केली आहे. होळीच्या दिवशी वनऔषधी म्हणून उपयोगात येणार्या एरंडीची मोठय़ा प्रमाणात कत्तल होत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने ४ मार्च रोजी प्रकाशित करुन शासन व पर्यावरणप्रेमींचे याकडे लक्ष वेधले होते हे विशेष. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत पुणे येथील अँड. असीम सरोदे, अँड. विंदा विलास राऊत-महाजन, अँड. सचिन विवेक गुप्ते, अँड.अलका बबलादी, अँड. स्मिता सरोदे-सिंगलकर, अँड. सविता खोटरे, अँड. रोशनी वानोड यांनी एकत्रितपणे जैवविविधता जपण्याचा विचार अधोरेखित करण्यासाठी एरंडीच्या झाडांबाबतची याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग, राज्य जैवविविधता मंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेच्या सुनावणीनंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्या. विकास किनगांवकर व डॉ.अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना शुक्रवारी ही नोटीस जारी केलीे. महाराष्ट्रात ९ हजार हेक्टर क्षेत्रात असलेली बहुमुल्य वनऔषधी एरंडी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेताच्या बांधावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी तसेच राज्य शासनाला वर्षाला २ कोटींचे उत्पन्न मिळवून देणार्या एरंडीच्या झाडांचा होळीच्या दिवशी करण्यात येणारा वापर जरी सदर पर्यावरण याचिकेचा विषय असला तरी एरंडीच्या अस्तित्वाबाबतचा प्रश्न व्यापकपणे मांडण्यात आला आहे. जैवविविधता कायदा २00२ च्या कलम २२ नुसार राज्य सरकारने राज्य जैवविविधता मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्रात मागील ४ वर्षापासून जैवविविधता मंडळ स्थापन करण्यात आले आहे. परंतु हे मंडळ कार्यरत आहे की, नाही संशोधनाचा विषय असल्याचे याचिकेत म्हटले आहे. जैवविविधता कायदा २00२ च्या कलम २४ नुसार राज्य जैवविविधता मंडळाने जैवविविधता नष्ट होणार्या कृतींना आळा घालणे आणि जैवविविधता संवर्धनासाठी काम करणे अपेक्षीत आहे. परंतु तशा पद्धतीचेही काम होताना दिसत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते अँड. असीम सरोदे यांनी म्हटले.
*असे आहे एरंडीचे महत्व
कोरडवाहू शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, पपई, द्राक्ष, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती कीडनाशक म्हणून तसेच पारंपारिक औषधी तयार करण्यासाठी एरंडीचा वापर केला जातो. एरंड या वनस्पतीच्या बीया, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडी वनऔषधीमुळे शहरातील वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, वस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश होतो.