नांदुरेकरांना अंध कासीम बेगच्या रामभजनांचा लळा
By Admin | Updated: September 19, 2014 00:23 IST2014-09-19T00:23:52+5:302014-09-19T00:23:52+5:30
दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेलेल्या अंध कासीम बेग हा डोळस धर्मांधांसमोर एक आदर्श आहे.

नांदुरेकरांना अंध कासीम बेगच्या रामभजनांचा लळा
सुहास वाघमारे /नांदुरा
समाजात समरसता वाढावी, जातीयता व धर्मभेद विसरून नागरिक एकोप्याने राहावेत याकरिता व्यापक जागृती केली जाते; मात्र काही कलाकार कलेच्या व संगीताच्या माध्यमातून धर्माच्या व जातीच्या भिंती तोडून एकात्मतेचा संदेश देतात, असाच अनुभव मागील चार दिवसांपासून शहरातील संत जंगली महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन सप्ताहात येत आहे. महिला कीर्तनकार स्मिताताई आजेगावकर व भजन तथा भक्तिगीतांनी नांदुरेकरांचे लक्ष वेधणारा दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लातूर जिल्हय़ातील कासीम बेग या स्मिताताईच्या मानसपुत्राने व त्यांनी जपलेल्या मानवतेच्या नात्याने त्यांनी एकात्मतेचा संदेश दिला आहे.
नांदुरा शहरात महादेव गौरक्षण संस्थान येथे संत जंगली महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भागवत कथा व कीर्तनांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये १३ ते १६ दरम्यान दररोज महिला कीर्तनकार स्मिताताई आजेगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांच्या सोबत त्यांचा मानसपुत्र कासीम बेग हा दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला गायक त्यांच्या रामभजन, भक्तिगीत, गजल व कव्वाली यांच्या गायनाने अनेकांचे लक्ष वेधले.
लातूर जिल्हय़ातील उद्गीर तालुक्यातील वाढोणा बु. या गावातील रहिवासी असलेल्या कासीमचे आई व वडील दोन्ही शेतमजूर आहे. त्यांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण विद्या विकास विद्यालय व एकलव्य अंध निवासी विद्यालयात झाले असून, त्याने आतापर्यंत दहावी, बारावी व पदवीच्या परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करून शैक्षणिक यश मिळविले आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने उच्च शिक्षणासाठी त्याला कीर्तनकार स्मिताताई यांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा हा मानस पुत्र आता प्रत्येक कीर्तनात भजन व भक्तिगीताने त्यांची साथ देत आहे. दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेलेल्या अंध कासीम बेग हा डोळस धर्मांधांसमोर एक आदर्श आहे.