पक्षश्रेष्ठींनी मागितली अकोला जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातून तीन इच्छुकांची नावे
By Admin | Updated: August 25, 2014 03:14 IST2014-08-25T02:57:29+5:302014-08-25T03:14:25+5:30
कॉँग्रेस पदाधिकारी पेचात : आठवडभरात होणार उमेदवारीबाबत निर्णय

पक्षश्रेष्ठींनी मागितली अकोला जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातून तीन इच्छुकांची नावे
अकोला : कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देण्यासाठी जिल्हाध्यक्षांकडे जिल्ह्यातील विधानसभानिहाय तीन इच्छुकांची नावे मागितली आहेत. लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कोणती तीन नावे पाठवावी, अशा पेचात पदाधिकारी सापडले आहेत.
विधान परिषदेच्या एका जागेवरून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आमने-सामने ठाकले होते; मात्र नंतर या निवडणुकीतून कॉँग्रेसने माघार घेतली होती. या घडामोडीनंतर दोन्ही पक्षात आघाडी होण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता. मात्र कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यातील सर्वच अर्थात २८८ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले. अकोला जिल्ह्यातूनही दोन्ही पक्षांकडून जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, बाळापूर, आकोट, मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले. मात्र मूर्तिजापूर मतदारसंघातून गत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उमेदवार रिंगणात होता. त्यामुळे कॉँग्रेसने मूर्तिजापूर मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नाहीत.
दरम्यान, प्रत्येक मतदारसंघासाठी कॉँग्रेस इच्छुकांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरील नेत्यांनी जिल्हाध्यक्षांकडून प्रत्येक मतदारसंघासाठी जास्तीत-जास्त तीन इच्छुकांची नावे मागितली आहेत. ही यादी प्राप्त झाल्यानंतर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.