राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत हवेच!
By Admin | Updated: August 15, 2014 01:23 IST2014-08-15T01:15:50+5:302014-08-15T01:23:18+5:30
अकोला येथील उपोषण सत्यपाल महाराजांच्या हस्ते सोडले.

राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत हवेच!
अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देशभक्त होते. त्यांनी देशातील जनतेला राष्ट्रधर्माचा संदेश दिला. त्यांचे नाव देशातील थोर पुरुषांच्या यादीत सामील व्हायलाच हवे, असे मत सत्यपाल महाराज यांनी गुरुवारी दुपारी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करा, या मागणीसाठी समाजसेवक गणेश पोटे व संजय चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. गुरुवारी सायंकाळी सत्यपाल महाराज यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.
गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला आचार्य वेरूळकर गुरुजी, गाडेकर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. तीन दिवस सातत्याने तुकडोजी महाराज यांचे कीर्तन या ठिकाणी करण्यात आले. राष्ट्रसंतांचे नाव समाविष्ट केले नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणारे गाडेकर महाराज म्हणाले की, राष्ट्रसंतांचे नाव देशाच्या थोर पुरुषांच्या यादीत अग्रक्रमाने असायला हवे होते. तुकडोजी महाराजांनी या देशातील तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत केली. युद्धादरम्यान ते देशाच्या सीमेवर गेले होते. ते स्वातंत्र्य सैनिक होते. १९४२ मध्ये इंग्रजांनी त्यांना रायपूरच्या जेलमध्ये टाकले होते. ह्यसारा भारत रहे शिपाई शत्रुको दहशाते, तुकड्यादास कहे भक्ती हो सबको स्फूर्ती दर्शानेह्ण, असा संदेश त्यांनी दिला. जापान येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचे नाव राष्ट्रीय थोर पुरुषांच्या यादीत अग्रक्रमाने घ्यायला हवे. मात्र, या यादीत तसे झाले नाही, यापेक्षा मोठे दु:ख नसल्याची खंत गाडेकर महाराज यांनी व्यक्त केली. उपोषण सोडविताना सत्यपाल महाराज, गाडेकर महाराज, माजी आमदार दाळू गुरुजी, दिलीप आसरे यांच्यासह अनेक गुरुदेवप्रेमी उपस्थित होते.