मूर्तिजापूर : दोन लाचखोर ‘पीएसआय’सह पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:57 IST2018-02-17T23:56:15+5:302018-02-17T23:57:57+5:30
अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला सहकार्य करण्यासाठी लाच मागणार्या दोन पीएसआयसह एका पोलीस कर्मचार्यास शनिवारी निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या तीन जणांच्या निलंबनाचा आदेश दिला.

मूर्तिजापूर : दोन लाचखोर ‘पीएसआय’सह पोलीस कर्मचारी निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला सहकार्य करण्यासाठी लाच मागणार्या दोन पीएसआयसह एका पोलीस कर्मचार्यास शनिवारी निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या तीन जणांच्या निलंबनाचा आदेश दिला. यामध्ये पीएसआय अश्विनी गायकवाड, पीएसआय गणेश कोथळकर, पोलीस कर्मचारी दीपक तायडे या तिघांचा समावेश आहे. एसीबीच्या अहवालानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मूर्तिजापूर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शिक्षण संस्थाचालकाच्या मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. यावरून मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पीएसआय अश्विनी गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. आरोपीला तपासात सहकार्य करण्यासाठी तसेच आरोपीला लाभ मिळेल, या दिशेने दस्तावेज तयार करण्यासाठी अँड. सचिन वानखडे याच्या माध्यमातून तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागण्यात आली; मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी मूर्तिजापूर गाठून आरोपी अश्विनी गायकवाड, गणेश कोथळकर व अँड. सचिन वानखडे या तिघांना ताब्यात घेतले; मात्र तीनही आरोपींना समजपत्र देऊन सोडले. यावरून अकोला एसीबीची कारवाई प्रचंड संशयाच्या घेर्यात सापडली. त्यानंतर एसीबीच्या अहवालावरूनच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पीएसआय अश्विनी गायकवाड, पीएसआय गणेश कोथळकर, पोलीस कर्मचारी दीपक तायडे या तीन जणांना निलंबित केले; मात्र आता एसीबीच्या अधिकार्यांची मोठी गोची झाल्याचे दिसून येत आहे. कारण समजपत्र देऊन सोडलेला एकही आरोपी अद्याप अटक करण्यात आला नसल्याने एसीबीकडे बोट दाखविण्यात येत आहे.