आठवडाभरासाठी मूर्तिजापूर शहराच्या सीमा सीलबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:28 IST2021-02-23T04:28:56+5:302021-02-23T04:28:56+5:30
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मूर्तिजापूर नगरपरिषद क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून २३ ...

आठवडाभरासाठी मूर्तिजापूर शहराच्या सीमा सीलबंद
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मूर्तिजापूर नगरपरिषद क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून २३ फेब्रुवारी सकाळी ६ वाजल्यापासून सोमवारी १ मार्च सकाळी ८ पर्यंत घोषित केले आहे. त्यामुळे सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, दवाखाने या ७ दिवसांच्या कालावधीत दररोज सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील, असे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व
मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी कळविले आहे.
७ दिवस शहर बंदिस्त करून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून शहरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. रेस्ट हाऊस जवळ अकोला नाका, चिखली गेट, भटोरी नाका, रेल्वे उड्डाणपूल, देवरण फाटा, आसरा रोड, दर्यापूर-कारंजा रस्त्यावरील नाका, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हिंदू स्मशानभूमी, अशा नऊ ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात येत असून, शहरात प्रवेश बंद करण्यात येत आहे. शहरांतर्गत काही पॉईंट निश्चित करून पोलीस दल तैनात करण्यात आले आहे, माहिती मुख्याधिकारी लोहकरे यांनी दिली.