मूर्तिजापूरचे बीडीओ अडचणीत
By Admin | Updated: February 4, 2015 01:40 IST2015-02-04T01:40:42+5:302015-02-04T01:40:42+5:30
योजनांमधील भ्रष्टाचार भोवणार; सभापतींची तक्रार.

मूर्तिजापूरचे बीडीओ अडचणीत
अकोला- मूर्तिजापूरचे गटविकास अधिकारी के. बी. श्रीवास्तव पुन्हा अडचणीत आले आहेत. यापूर्वी वृक्ष लागवडीच्या प्रकरणात कारवाईला सामोरे जाणारे बीडीओ आता भ्रष्टाचार आणि शासकीय संपत्तीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. पंचायत समिती सभापतींनी केलेल्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांनी बीडीओवर कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे ३0 जानेवारी रोजी केली. सिंचन विहिरीच्या कामांचे प्रस्ताव, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थ्यांची दिशाभूल करणे, इंदिरा आवास व रमाई आवास योजनेचा निधी बँकेत ठेवताना शासनाचे निर्देश डावलणे आदी आरोप मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सभापती शुभांगी खंडारे यांनी २७ जानेवारी रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केले होते. या तक्रारीतच बीडीओंकडून शासकीय योजना राबविल्या जात नसल्याचा आरोपही सभापतींनी केला. बीडीओ शासकीय वाहनाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी केला आहे. सभापतींनी केलेल्या या सर्व आरोपांची चौकशी करून उचित कारवाई करण्याची शिफारस पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली आहे. दरम्यान के बी श्रीवास्तव यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सभापतींच्या सर्वच मागण्या नियमानुसार मान्य करणे शक्य होत नसल्याने बरेचदा पदाधिकार्यांकडून योजनांचा निधी एका योजनेकडून दुसर्या योजनेकडे वळता करण्यासाठी दबाव येत असल्याचे सांगून त्यामुळेच आरोप झाला असल्याचे त्यांनी सांगीतले.