पती व जावयाच्या मदतीने दुसर्या पत्नीची हत्या
By Admin | Updated: August 1, 2014 02:19 IST2014-08-01T02:12:43+5:302014-08-01T02:19:24+5:30
वाशिम जिल्ह्यातील घटना : तीन आरोपींना अटक

पती व जावयाच्या मदतीने दुसर्या पत्नीची हत्या
वाशिम : मालमत्तेमध्ये हिस्सा पडेल म्हणून पती व जावयाच्या मदतीने महिलेने सवतीस विहिरीत ढकलून देऊन तिची हत्या केल्याचा प्रकार ३0 जुलै रोजी रात्री वाशिम तालुक्यातील सावंगा जहागीर येथे उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
वाशिम तालुक्यातील सावंगा जहागीर येथील दिलीप पट्टेबहाद्दूर यांचा पहिला विवाह रूक्मिना हिच्याशी झाला. त्यांच्या दोन्ही मुलींचे विवाह पार पडले. पत्नीच्या आजारपणामुळे दिलीप पट्टेबहाद्दूर याने सोनगव्हाण येथील सागर नावाच्या महिलेशी दुसरा विवाह केला होता.
मालमत्ता वाटणीत दुसर्या पत्नीचा हिस्सा पडत असल्याची सबब देत रूक्मिना पट्टेबहाद्दूर, दिलीप पट्टेबहाद्दूर व त्यांचा जावई प्रकाश हरिभाऊ गायकवाड यांनी संगनमत करून २८ जुलै रोजी २९ वर्षीय सागर पट्टेबहाद्दूरला बेदम मारहाण केली व तांदळी शेवई शेतशिवारातील एका विहिरीत ढकलून दिले. त्यात तिचा जीव गेला. घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आल्यानंतर मृतकाचे नातेवाईक मुकिंदा राजाराम भिसे याने वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये नोंदविलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३0२, ३४ अन्वये तिघांविरूद्ध गुन्हा नोंदविला व त्यांना अटक केली.