मुगाचे पीक हातचे गेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:08 IST2017-08-28T01:08:32+5:302017-08-28T01:08:32+5:30
‘समान काम, समान वेतन’ लागू करू न, थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १६ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मुगाचे पीक पंधरा दिवसांपासून वाळले आहे; परंतु काढण्यासाठी मजूरच नसल्याने मुगाच्या शेंगा गळून पडल्या आहेत. इतरही संशोधनाची कामे प्रभावित झाली आहेत.

मुगाचे पीक हातचे गेले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘समान काम, समान वेतन’ लागू करू न, थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १६ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मुगाचे पीक पंधरा दिवसांपासून वाळले आहे; परंतु काढण्यासाठी मजूरच नसल्याने मुगाच्या शेंगा गळून पडल्या आहेत. इतरही संशोधनाची कामे प्रभावित झाली आहेत.
केंद्र सरकारने पारित केलेला कायदा १९७६ कलम ४ अन्वये तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्व कृषी विद्यापीठात हे वेतन दिले जात आहे. तथापि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी मजुरांना समान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत मजुरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. विद्यापीठाच्या बाराही विभागातील रोजंदारी मजुरांनी कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन सुरू केले आहे.
जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.
कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर यावर्षी मूग पेरण्यात आला आहे. तसेच यामध्ये बीजोत्पादनासाठीचा मूग आहे.
मागील १0 ते १५ दिवसांपासून हा मूग वाळला असून, काढणीला आला आहे; परंतु मजूरच नसल्याने हे पीक खाली गळू लागले असून, गुरांनी हे पीक फस्त करणे लावले आहे. अनेक भागात हे पीक विरळ झाले आहे. काही भागात मूग हिरवा आहे. त्यावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.