आई एवढे कशालाच मोल नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:18 IST2021-05-12T04:18:56+5:302021-05-12T04:18:56+5:30

वाडेगाव : परिस्थिती जेमतेम...मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. अशातच मुलाला किडनीचा त्रास असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे ...

Mom is worth nothing ... | आई एवढे कशालाच मोल नाही...

आई एवढे कशालाच मोल नाही...

वाडेगाव : परिस्थिती जेमतेम...मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. अशातच मुलाला किडनीचा त्रास असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. परंतु आता किडनी देणार कोण? असा प्रश्न होता. अखेर आईनेच मुलाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रत्यारोपणासाठी लाखो रुपये कुठून आणणार? असा प्रश्न गवई कुटुंबासमोर उभा राहिला होता. लोकमतच्या माध्यमातून गवई कुटुंबीयांनी सहृदयी समाजमनाला साद घातली आणि सहृदयी समाज मदतीला धावून आला. अखेर उमेश रामदास गवई (३५) याच्या शरीरात आईने दिलेल्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.

पोटच्या गोळ्यासाठी आईच धावून आली. शेवटी आईचे हृदयच ते. मुलाचं दु:ख तिला कसं सहन होणार...म्हणूनच एक कवी आईविषयी लिहिताना म्हणतो, ‘आईएवढे कशालाच मोल नाही...जिचे जन्मांतरीचे ऋण आहे...असे ऋण हे ज्यास व्याज नाही...’असेच याही आईसाठी म्हणावे लागेल.

पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील उमेश रामदास गवई (३५) याला मागील वर्षीपासून किडनीच्या आजाराने ग्रासले होते. अकोला येथे प्राथमिक उपचार केले. परंतु आराम पडला नाही. त्याचे डायलिसिस केले. परंतु त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याने, किडनीरोग तज्ज्ञांनी त्याला किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. यामुळे उमेश गवई यांच्या कुुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. पोटच्या मुलाला किडनी देण्यासाठी आईच धावून आली. आता किडनी तर मिळाली. घरची परिस्थिती नाजूक. किडनी प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा होता. जवळचा सर्व पैसा प्राथमिक उपचार, औषध व डायलिसिसमध्ये खर्च झाला. किडनी प्रत्यारोपणासाठी गवई कुटुंबाला १५ ते १६ लाख रुपयांची गरज होती.

फोटो:

उमेशला मिळाला दुसरा जन्म

मुलाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी आईने समाजमनाला साद घातली. समाजमन हेलावून गेले. सहृदयी दानदात्यांनी पुढाकार घेत, उमेशच्या किडनी प्रत्यारोपणासाठी यथाशक्ती आर्थिक मदत दिली. या मदतीसह गवई कुटुंबीयांनी गोळा केलेल्या पैशांमधून उमेश गवई याच्या शरीरात आईच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यामुळे उमेशला दुसरा जन्म मिळाला आहे.

फोटो:

माउलीने मानले लोकमतचे आभार

लोकमतने मदतीचा हात अंतर्गत वृत्त प्रकाशित करताच, सहृदयी दानदात्यांनी आर्थिक स्वरूपात मदत दिली. अखेर आईने मुलाला किडनी देऊन त्याला दुसरा जन्म दिला. आज मातृत्व जिंकले. लोकमतच्या पुढाकारातून उमेशच्या किडनी प्रत्यारोपणासाठी सहृदयी समाजमन धावून आले. त्यामुळे त्याच्यावर उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे आई लताबाई गवई यांनी लोकमतचे आभार मानले.

यांनी केली मदत

लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अनेक दानशूर व काही संस्था यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत केली. गावातील जेतवन विहार, विशाखा महिला संघ, सार्वजनिक शिवजयंती, भीमजयंती उत्सव समितीचे सभासद व अनेक सहृदयी दानदात्यांनी केलेल्या मदतीमुळे उमेशला जीवदान मिळाले.

Web Title: Mom is worth nothing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.