शेतमालाला हमी भाव न देता खात्यात तुटपुंज्या मदतीचा गवगवा- आमदार नितीन देशमुख

By आशीष गावंडे | Published: March 2, 2024 11:31 PM2024-03-02T23:31:39+5:302024-03-02T23:32:18+5:30

शेतकरी संघर्ष यात्रेत आमदारांनी सरकारवर निशाणा

MLA Nitin Deshmukh said that there is little help in the account without guaranteeing prices for agriculture | शेतमालाला हमी भाव न देता खात्यात तुटपुंज्या मदतीचा गवगवा- आमदार नितीन देशमुख

शेतमालाला हमी भाव न देता खात्यात तुटपुंज्या मदतीचा गवगवा- आमदार नितीन देशमुख

आशिष गावंडे, अकोला: अस्मानी संकटाने राज्यातील शेतकरी हतबल झाला असताना केंद्र व राज्य सरकारकडून कापूस, साेयाबीन, कांदा, तूर यासह इतर शेतमालाला हमी दिला जात नाही. हमीभावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य न देता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दर तीन महिन्यांच्या कालावधीत तुटपुंजी आर्थिक मदत केली जात असल्याचे सांगत शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला.

शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिर परिसरात शेतकरी संघर्ष यात्रेचा शनिवारी रात्री समाराेप करण्यात आला,यावेळी आ.देशमुख यांनी भाजपाचा समाचार घेतला. व्यासपिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, बुलढाणा सहायक संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, हरिदास भदे, संजय गावंडे, जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, बबलू देशमुख, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, ज्योत्स्ना चोरे, मंजुषा शेळके, देवश्री ठाकरे आदी उपस्थित हाेते.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काेराेना काळात जनतेचा मनापासून सांभाळ केला. उध्दव ठाकरे यांच्या कामाची दखल घेतल्यामुळेच देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला हाेता. यामुळे भाजपला पाेटशुळ निर्माण झाल्याने त्यांनी जाणीवपूर्वक काेराेना काळातील कामकाजावर आराेप केल्याचेही देशमुख यांनी सांगितले. यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांनी उपस्थितांना संबाेधित करुन संघर्ष यात्रेमुळे जिल्ह्यातील शेतकरी एकवटल्याचे स्पष्ट केले. 

राज्यातील वातावरण दुषित केले!

भाजपचे हिंदुत्व बेगडी असून धर्म,जातीवर आधारित राजकारण करण्याचा चूकीचा पायंडा निर्माण केल्याची टिका आ.नितीन देशमुख यांनी केली. सख्खे भाऊ, काका,पुतण्यांमध्ये फोडाफोडी करून घराघरांमध्ये भांडणे लावली, असे यापूर्वी कधीच घडले नाही. ही परिस्थिती पाहता लोकांनी सुज्ञ होण्याची गरज असल्याचे आवाहन आ.देशमुख यांनी केले.

देशात लाेकशाही पायदळी
तपास यंत्रणांचा गैरवापर करुन राजकीय पक्षातील नेत्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. भ्रष्टाचाराचे आराेप केल्यानंतर त्याच नेत्याला पक्षात का सामील करुन घेता, असा सवाल यावेळी आ.देशमुख यांनी उपस्थित केला. भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची चाैकशी बंद हाेते,हे सर्व पाहता लाेकशाही पायदळी तुडविल्या जात असल्याचा आराेप आ.देशमुख यांनी केला.

Web Title: MLA Nitin Deshmukh said that there is little help in the account without guaranteeing prices for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला