ग्रामसभांमध्ये संदेशच पोहोचला नाही!
By Admin | Updated: January 28, 2016 00:49 IST2016-01-28T00:49:04+5:302016-01-28T00:49:04+5:30
अकोला जिल्ह्यातील अनेक ग्रामसभा संदेशपत्र वाचनाशिवाय आटोपल्या.

ग्रामसभांमध्ये संदेशच पोहोचला नाही!
अकोला: प्रजासत्ताक दिनी (मंगळवारी) जिल्हय़ात घेण्यात आलेल्या ग्रामसभांमध्ये ग्राम विकास मंत्र्यांच्या संदेशपत्राचे वाचन करावयाचे होते; मात्र संदेशपत्र पोहोचले नसल्याने, जिल्हय़ातील अनेक गावांमध्ये ग्रामसभांमध्ये ग्राम विकास मंत्र्यांच्या संदेशपत्राचे वाचन करण्यात आले नसल्याची बाब समोर आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने पंचायत राज व्यवस्थेतील पायाभूत संस्थेचे प्रमुख व प्रथम नागरिक म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायातींच्या सरपंचांना लिहिलेल्या पत्राचे ग्रामसभांमध्ये वाचन करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले होते. ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी सरपंचांना लिहिलेले संदेश पत्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांच्यामार्फत २२ जानेवारी रोजी जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले. प्राप्त झालेले हे संदेश जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत जिल्हय़ातील अकोला, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांना पाठविण्यात आले. तसेच ग्रामसभांमध्ये ग्राम विकास मंत्र्यांच्या संदेश पत्राचे वाचन करण्याचे निर्देश जिल्हा परिषदमार्फत गटविकास अधिकार्यांना देण्यात आले; परंतु २६ जानेवारी रोजी जिल्हय़ातील सातही तालुक्यात घेण्यात आलेल्या ग्रामसभांमध्ये अनेक ठिकाणी ग्रामसभांमध्ये ग्राम विकास मंत्र्यांच्या संदेशपत्राचे वाचन करण्यात आले नाही. संदेश पत्र मिळाले नसल्याने, जिल्हय़ातील अनेक ग्रामसभांमध्ये ग्राम विकास मंत्र्यांच्या संदेश पत्राचे वाचन झालेच नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना उपलब्ध होणारा निधी, त्यामधून गाव विकासाची करावयाची प्राधान्याने विकासकामे, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत पाणी ताळेबंदाचा विचार करून गावाचा आराखडा तयार करणे, मूल्यावर आधारित कर वसुली धोरणाची अंमलबजावणी यासह गाव विकासाच्या मुद्दय़ावर ग्राम विकास मंत्र्यांनी दिलेला संदेश ग्रामससभांद्वारे ग्रामस्थांपर्यंत पोहोचू शकला नाही.