शेतक-यांचा माती जगविण्याचा संदेश आता आंतरराष्ट्रीय स्तरावर
By Admin | Updated: February 28, 2015 00:45 IST2015-02-28T00:45:31+5:302015-02-28T00:45:31+5:30
फिलिपाइन्स येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत अकोल्यातील शेतक-यांचा समावेश.

शेतक-यांचा माती जगविण्याचा संदेश आता आंतरराष्ट्रीय स्तरावर
अकोला : मातीचा पोत कायम ठेवून उत्पादनाचा हव्यास न करता माती जगविण्याचा निंबारा येथील गणेश नानोटे या शेतकर्याचा प्रयोग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील निंबारा या छोट्याशा गावातील शेतकर्याची फिलिपाइन्स येथे होणार्या आंतरराष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
फिलिपाइन्स येथील मनीला मकारी येथे नववी पॅन एशिया फार्र्मस एक्सचेंज प्रोग्रामचे आयोजन २ ते ७ मार्चदरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता भारतातून पाच शेतकर्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अकोला जिल्ह्यातील निंबारा येथील गणेश नानोटे यांना संधी मिळाली आहे. नानोटे यांच्या नावाची शिफारस दिल्ली येथील अँबल इंडिया या स्वयंसेवी संस्थेने केली होती. नानोटे यांना स्वामिनाथन फाउंडेशनचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच शेती गौरव पुरस्कार, रोटरी क्लबचा कृषी दीपस्तंभ पुरस्कार, तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला व ह्यलोकमतह्णच्यावतीने दिला जाणारा कृषिरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी शेतात केलेले संशोधन ते आता फिलिपाइन्स येथे मांडणार आहेत.
नानोटे यांच्याकडे ५0 एकर ओलिताची शेती आहे. ते प्रामुख्याने कपाशीचे पीक घेतात. कपाशी व गव्हाचे पीक आल्यानंतर कुटार काढून त्याची विक्री न करता ते शेतातच गाडतात. त्यातून सेंद्रिय खत तयार होते. या खतामुळे पुढील वर्षी उत्पादनात वाढ होते. उत्पादनाच्या हव्यासापोटी मातीत जास्तीत जास्त रासायनिक खते टाकणे व मातीचा पोत बिघडविण्यास नानोटे यांचा विरोध आहे. त्यामुळे ते मातीत आवश्यक तेवढेच खत टाकतात. त्यामुळे उत्पादनातही वाढ होते. कपाशीचे एक वर्षांचे पीक ते केवळ सहा महिनेच घेतात. त्यांच्या या प्रयोगामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होत असून, मातीचे आरोग्यही चांगले राहते. या प्रयोगाबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.