गाडगेबाबा जयंती उत्सव समितीच्या शोभायात्रेतून स्वच्छतेचा संदेश
By Admin | Updated: February 24, 2015 01:14 IST2015-02-24T01:14:02+5:302015-02-24T01:14:02+5:30
भजनी दिंड्या, लेझिम पथक व विविध आखाड्यातील मुलामुलींचा समावेश.

गाडगेबाबा जयंती उत्सव समितीच्या शोभायात्रेतून स्वच्छतेचा संदेश
अकोला : कर्मयोगी संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीच्यावतीने सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली.
अकोल्यात कर्मयोगी संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीच्यावतीने गत पाच वर्षांपासून संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त शोभायात्रा काढली जाते. सोमवारी सकाळी ११ वाजता राजराजेश्वर मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रेत भजनी दिंड्या, सांप्रदायिक दिंड्या, गाडगेबाबांचे विचार दर्शवणारी तैलचित्रे, गाडगेबाबांचा रथ, वाजंत्री तसेच विविध आखाय़ातील मुले-मुली यांचा समावेश होता. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार व औरंगाबादचे खंडुजी गायकवाड यांनी शोभायात्रेत गाडगेबाबांची वेशभूषा साकारली होती. ढोल-ताशांवर निघालेल्या शोभायात्रेत लेझीम पथकाने विविध कवायती सादर केल्या, तर टाळ-मृदंगाच्या मंजुळ ध्वनीवर मार्गक्रमण करणार्या विविध भजनी मंडळांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या विविध आखाड्यांतील मुलामुलींनी रोप मलखांब व सायकल मलखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. सिटी कोतवाली चौकामध्ये कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांचे कीर्तन झाले. त्यांच्यासह खंडुजी गायकवाड यांनी खराटा हाती घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला. राजराजेश्वर मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा जय हिंद चौक, सिटी कोतवाली, महानगरपालिका, खुले नाट्यगृह अशा मार्गाने प्रमिलाताई ओक सभागृहात पोहोचली. या ठिकाणी शोभायात्रेचे रूपांतर सभेत झाले. सभेमध्ये महदेवराव भुईभार व इतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.