लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेत प्रशासनाने सेविका आणि मदतनीस पदासाठी अर्ज मागितले होते. सेविका आणि मदतनीस पदासाठी ९०० पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले. अर्जांची छाननी केल्यानंतर उद्या मंगळवारी चिवचिव बाजार परिसरातील मनपाच्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयात सकाळी ११ वाजता मुलाखत प्रक्रिया पार पडेल. यासाठी पाच सदस्यीय समितीचे गठन केले आहे. आयुक्त अजय लहाने यांनी मनपाच्या शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या शालेय सत्रापासून ३३ शाळांमध्ये नर्सरी, केजी-१, केजी-२ चे वर्ग सुरू केल्या जातील. निकषानुसार पात्र ३३ महिला शिक्षणसेविका आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी ३३ महिला मदतनीस यांची निवड केली जाणार आहे. मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
मनपा कॉन्व्हेंट; आज मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:42 IST