सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून अनाथाश्रमातील मुलींमध्ये केली जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 12:43 PM2021-03-08T12:43:37+5:302021-03-08T12:45:28+5:30

Women's Day Special : क्षितिज फाऊंडेशन ही सामाजिक संस्था स्थापन करून त्या माध्यमातून राज्यातील 25 हजार मुलींमध्ये मासिक पाळी शाप नसून वरदान असल्याची जनजागृती केली.

Menstrual awareness among orphan girls leaving the job of software engineer | सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून अनाथाश्रमातील मुलींमध्ये केली जागृती

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून अनाथाश्रमातील मुलींमध्ये केली जागृती

Next

- सचिन राऊत

अकोला : अनाथ आश्रम शाळेतील मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर त्या कोवळ्या मुली स्वतःला एका खोलीत कोंडून घेत असल्याचे दिसल्यानंतर एका सॉफ्टवेअर इंजिनियरच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची नोकरी सोडून स्नेहल चौधरी कदम यांनी या मुलींसाठी क्षितिज फाऊंडेशन ही सामाजिक संस्था स्थापन करून त्या माध्यमातून राज्यातील 25 हजार मुलींमध्ये मासिक पाळी शाप नसून वरदान असल्याची जनजागृती केली. त्यांच्या या कार्याची दखल जर्मनी फ्रान्स आणि थायलंड सारख्या देशांनी घेऊन त्यांचा गौरवही केला आहे.

स्नेहल चौधरी कदम यांनी वाशिम जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पूर्ण करून सॉफ्टवेअर इंजिनियर झाल्यानंतर बक्कळ पैसा कमावून आरामाचे आयुष्य जगत होत्या. मात्र स्वहिताकडे दुर्लक्ष करीत सामाजिक जाणिवेतून मुलींमध्ये मासिक पाळी दरम्यान होणारी कुचंबणा त्यांच्या मनातून दूर करण्यासाठी स्नेहल चौधरी कदम यांनी क्षितिज फाऊंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनचे सदस्य तसेच प्रतिनिधी राज्यभर कार्यान्वित केले. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात त्यांनी एक प्रतिनिधी नेमून ज्या मुलींना मासिक पाळी संदर्भात अज्ञान आहे. त्यांच्यात मासिक पाळीतील स्वच्छता, आरोग्य या संदर्भात जनजागृती सुरू केली. स्वतः स्नेहल चौधरी यांनी आदिवासी भाग, अनाथाश्रम व अनाथ मुलीमध्ये आरोग्यविषयक जनजागृती केली. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे घेऊन या मुलींना मासिक पाळी दरम्यान काय करायला हवे या संदर्भात मार्गदर्शन करून वैधकीय सेवा दिली. यासोबतच 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांना मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांची जागृती केली. तसेच या कालावधीत त्यांनी काय करायला हवे यासंदर्भात डॉक्टरांना सोबत घेऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार करून उदबोधन केले. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांसाठी वेंडिंग मशीन लावण्याचा त्यांचा मानस असून यासाठी त्यांनी कार्य सुरू केले आहे. निरोगी मातृत्व, निरोगी महिला, निरोगी मुलगी हा त्यांचा ध्यास असून प्रत्येक माता व मुलगी निरोगी राहायला हवी यासाठी त्यांनी राज्यभर क्षितिज फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्य सुरू ठेवले आहे.

तीन देशांकडून कार्याची दखल स्नेहल चौधरी कदम यांनी अनाथाश्रमातील मुली, आदिवासी भाग व अशिक्षित महिला व मुलींना मासिक पाळी शाप नसून वरदान असल्याची जनजागृती केली. यासाठी त्यांनी निबंध स्पर्धा, विविध लेख, लेखन स्पर्धा घेतल्या. या कार्याची दखल घेत जर्मनी, थायलंड आणि फ्रान्स या देशांनी त्यांचा गौरव केला आहे. तसेच यासाठी त्यांनी लेखही पाठविले आहेत.

राज्य शासनाचा युवा पुरस्कार क्षितिज फाउंडेशनच्या संस्थापिका संचालक स्नेहल कदम यांना महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सोबतच समाज मानव पुरस्कार, इंनूराम सेवा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. मासिक पाळी संदर्भातील त्यांचे कार्य हे प्रेरणादायी असल्याने त्यांचा विविध सामाजिक संघटनांकडूनही गौरव करण्यात आला आहे.

Web Title: Menstrual awareness among orphan girls leaving the job of software engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.