मनपाच्या वैद्यकीय पथकाने गाशा गुंडाळला; तपासणीला ‘खो’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 10:21 IST2020-05-25T10:21:03+5:302020-05-25T10:21:09+5:30
‘हॉटस्पॉट’ भागातील ५ हजार कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्रपणे मनपाच्या चार वैद्यकीय पथकांचे गठन केले होते.

मनपाच्या वैद्यकीय पथकाने गाशा गुंडाळला; तपासणीला ‘खो’!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी ‘हॉटस्पॉट’ भागातील ५ हजार कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्रपणे मनपाच्या चार वैद्यकीय पथकांचे गठन केले होते. या पथकांनी नागरिकांच्या तपासणीकडे पाठ फिरवत गाशा गुंडाळला. याप्रकरणी मनपा आयुक्तांसह उपायुक्त तसेच सहायक आयुक्तांना चुकीची आकडेवारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.
शहराच्या बैदपुरा परिसरामध्ये कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण सात एप्रिल रोजी आढळून आला होता. मनपा प्रशासनाने पहिला रुग्ण आढळून येताच हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला. या कालावधीत बैदपुरा, मोमिनपुरा, ताजनापेठ, फतेह अली चौक, कलाल की चाळ, माळीपुरा, गवळीपुरा, सराफा बाजार, मोहम्मद अली रोड आदी भागात कोरोना विषाणूने हात-पाय पसरल्याचे समोर आले.
आजरोजी शहरातील कोरोनाबाधित रुगणांचा आकडा ३८७ च्या पलीकडे गेला आहे. यादरम्यान, पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी कंटेनमेन्ट झोनमधील परिस्थितीचा प्रत्यक्षात आढावा घेतला असता कोरोनाचे उगमस्थान असलेल्या भागांमध्ये आरोग्य तपासणी वाढविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते.
आयुक्तांच्या नियोजनाची लावली वाट
पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी ‘हॉटस्पॉट’ भागातील ५ हजार कुटुंबातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकांचे नियोजन केले होते. या पथकांनी थातूरमातूर आरोग्य तपासणी करीत गाशा गुंडाळल्याची माहिती आहे.
सहा दिवसात तपासणी कशी?
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या बैदपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, माळीपुरा व गवळीपुरा या चार परिसरातील सुमारे ५ हजार कुटुंबांना मनपाचे वैद्यकीय अधिकारी भेट देणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले होते. या पथकांनी १६ मे रोजी बैदपुरा भागात तपासणीला प्रारंभ केला आणि २१ मे रोजी तपासणीचा गाशा गुंडाळला. त्यामुळे सहा दिवसात या पथकांनी किती रुग्णांची तपासणी केली, याची माहिती देण्यास वैद्यकीय आरोग्य विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे.
आरोग्य विभागावर नियंत्रण नाहीच!
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने शहरातील मालमत्तांचा सर्व्हे असो किंवा बाहेरगावातून दाखल होणाºया नागरिकांची नोंद घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्याचा विषय असो, सुरुवातीपासूनच मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने चालढकल केल्याचे दिसून आले आहे. या विभागावर प्रशासनाचे कवडीचेही नियंत्रण नसल्याचा परिणाम सर्वसामान्य अकोलेकरांना भोगावा लागत आहे.