अकोल्यात भरवस्तीत आढळला मसन्या उद
By Atul.jaiswal | Updated: March 19, 2024 13:57 IST2024-03-19T13:57:05+5:302024-03-19T13:57:19+5:30
वनविभागाच्या चमूने घटनास्थळी धाव घेऊन मसन्या उदला पकडून सुरक्षित अधिवासात सोडले.

अकोल्यात भरवस्तीत आढळला मसन्या उद
अतुल जयस्वाल, अकोला: निसर्गाचा स्वच्छता दूत अशी ओळख असलेला मसन्या उद (उदमांजर) हा दुर्मिळ निशाचर सस्तन प्राणी मंगळवारी (१९ मार्च) सकाळी जुने शहरातील डाबकी रोड भागात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. वनविभागाच्या चमूने घटनास्थळी धाव घेऊन मसन्या उदला पकडून सुरक्षित अधिवासात सोडले.
डाबकी रोड परिसरात मसन्या उद आढळल्याची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. उप वनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांनी तातडीने वनविभागाची चमू घटनास्थळी पाठविली. रेस्क्यूटीमचे सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनरक्षक वनिता तायडे, चालक यशपाल इंगोले, आलासिंग राठोड, अक्षय पांढरे हे घटनास्थळावर पोहोचले असता त्यांना मसन्या उद पकडण्यासाठी परिश्रम करावे लागले. कधी झाडावर तर कधी घरावर चढून मसन्याउदने वनविभागाच्या चमूला चांगलेच दमविले. शेवटी बाळ काळणे यांनी त्याला शिताफिने पकडले व सोबत आणलेल्या पिंजऱ्यात ठेवले. यावेळी परिसरातील आशिष शिरसाट, संदीप भाडे, पंकज शिरसाट, अजय नावकर, बुद्धभुषण ढवळे, अजिंक्य शिरसाट, राहुल गवई, विवेक दामोदर यांनी सहकार्य केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
निसर्गाचा स्वच्छता दूत
मसन्या ऊद हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे. त्याच्या आंगावर काळे जाड केस असतात. त्याच्या शरीरा इतकीच त्याची शेपटीसुद्धा लांब असते हा प्राणी फळे, मांस, किडे खातो. तसेच दिवसा हा प्राणी झाडाच्या फांदीला किंवा ढोलीत झोपतो. रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो. हा दुर्मिळ वन्यजीव सहसा स्मशानभूमीजवळ आढळतो, असे बाळ काळणे यांनी सांगितले.