Maratha Reservation: जिल्हा बंदचे आवाहन मागे; शांततेच्या मार्गाने करणार ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 12:57 IST2018-08-08T12:56:19+5:302018-08-08T12:57:16+5:30
अकोला : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने केलेल्या विनंतीचा मान राखून ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आलेले जिल्हा बंदचे आवाहन मागे घेण्यात आले.

Maratha Reservation: जिल्हा बंदचे आवाहन मागे; शांततेच्या मार्गाने करणार ठिय्या आंदोलन
अकोला : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने केलेल्या विनंतीचा मान राखून ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आलेले जिल्हा बंदचे आवाहन मागे घेत, शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून, मराठा आरक्षणाच्या लढ्यात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत आयोग स्थापन करण्यात येणार असून, तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने सकल मराठा समाजाला केली आहे. त्यानुषंगाने मंगळवारी अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे अकोला जिल्हा सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. उच्च न्यायालयाने केलेल्या विनंतीचा मान राखून, येत्या ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने अकोला जिल्हा बंदचे करण्यात आलेले आवाहन मागे घेण्यात घेण्यात आले असून, ९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करून, मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनात बळी गेलेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय जिल्हा सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातील मराठा समाजबांधव उपस्थित होते.