मोलकरणींना अनेक दरवाजे बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST2021-04-13T04:17:26+5:302021-04-13T04:17:26+5:30
कोरोनामुळे अनेकांवर संकट कोसळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या आठवड्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घरकाम ...

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद!
कोरोनामुळे अनेकांवर संकट कोसळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या आठवड्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घरकाम करणाऱ्या मोलकरणींवर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या भीतीपोटी अनेक महिलांनी मोलकरणींना घराचे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे गोरगरीब मोलकरीण महिलांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एक मोलकरीण दररोज पाच-सहा घरांमध्ये धुणे, भांडे, झाडूपोछा, स्वयंपाकाचे महिन्याकाठी ७ ते ८ हजार रुपये मजुरी मिळते; परंतु आता घरेच बंद झाल्यामुळे मोलकरणींवर बेराेजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, गॅस सिलिंडर, वीजबिल, किराणा, घराचे भाडे आदींसाठी पैसा कुठून आणावा. याची चिंता मोलकरणींना सतावत आहे. विशेष ज्या घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम केले. त्या घरांमधूनच मोलकरणींना अद्याप मोलमजुरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यासमोरील संकट अधिकच वाढले आहे. आतातर कामही बंद झाले. आता काय करावे. कसे भागवावे. आदी प्रश्नांची घालमेल मोलकरणींच्या मनात सुरू झाली आहे. यासोबतच शहरातील हॉस्पिटल, कॅटरिंग, हॉटेल्स, बार, भोजनालयात काम करणाऱ्या महिलासुद्धा वर्षभरापासून बेरोजगार झाल्या आहेत. अनेक महिला भाजीपाला विक्रीसह इतर काही किरकोळ कामे करून उदरनिर्वाह भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोलकरणींना अनेक घरांचे दरवाजे बंद झाल्यामुळे शासनाने मोलकरणींना मानधन देण्याची तरतूद करावी, अशी मागणी श्रमिक महिला मोलकरीण संघाच्या अध्यक्ष कल्पना शैलेश सूर्यवंशी यांनी केली आहे.
शहरातील मोलकरणींची साधारण संख्या - ३५००
एका घरातून मिळतात ५०० रुपये
माेलकरीण महिलांना एका घरात धुणे, भांडे, झाडूपोछा यापैकी एक काम करण्याचे महिन्याकाठी ५०० रुपये मिळतात. धुणे, भांडे, झाडूपोछा करणाऱ्या माेलकरणीला महिन्याकाठी १५०० रुपये मिळतात. पाच-सहा घरांमध्ये काम केल्यास, महिन्याकाठी ७ ते ८ हजार रुपये मिळतात. चार-पाच घरांमध्ये पोळ्या लाटणाऱ्या महिलांना महिन्याकाठी चार ते पाच हजार रुपये मिळतात; परंतु आता कोरोनामुळे अनेक घरांमध्ये मोलकरीण, स्वयंपाक करणाऱ्या महिलांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हॉटेल, भोजनालय, कॅटरिंगचे काम करणाऱ्या महिला बेराजगार
कोरोनामुळे शहरातील अनेक हॉटेल, भोजनालय बंद आहेत. लग्नसमारंभासह इतर सोहळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडत असल्यामुळे कॅटरिंगचा व्यवसायसुद्धा कमी झाला आहे. त्यामुळे अनेक महिलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हॉटेल्स, भोजनालय, कॅटरिंगचे काम करणाऱ्या महिलांची संख्याही दोन हजारांच्या जवळपास आहे.
कोरोनामुळे घरांमध्ये येऊ देत नाही. कामं नाहीत. केलेल्या घरकामाचेच पैसे मिळाले नाहीत. भाड्याचे घर आहे. त्यात पतीचे निधन झाले आहे. घरातील कर्ती महिला असल्याने, उदरनिर्वाह कसा भागवावा. असा प्रश्न उभा राहिला आहे.
-शकुंतलाबाई सुर्यवंशी, मोलकरीण
धुणे, भांडे, झाडूपोछा आणि स्वयंपाकाचे काम करून कसाबसा आमच्या मोलकरीण महिला कुटुंबाचा गाडा चालवितात. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, आमच्या मोलकरणींना घरांमध्ये येऊ देत नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. शासनाने मोलकरीण महिलांना तात्पुरत्या स्वरूपात मानधन देण्याची योजना सुरू करावी.
-कल्पना सूर्यवंशी, अध्यक्ष, श्रमिक महिला मोलकरीण संघ
कोरोनामुळे तर आमचा रोजगार हिरावला गेला. अनेक घरांचे दरवाजे आमच्यासाठी बंद झाले. चार घरांमध्ये कामे करून मिळालेल्या मिळकतीवर संसार चालायचा. आता घरातील पाच तोंडाचे पोट कसे भरणार, असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. शासनाने मोलकरीण महिलांसाठी मदत जाहीर करावी. अशी आमची मागणी आहे.
-सुजाता राऊत, सचिव, श्रमिक महिला मोलकरीण संघ