आंब्याचे दर आटोक्यात; निर्बंधांमुळे विक्री मंदावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST2021-05-12T04:19:00+5:302021-05-12T04:19:00+5:30
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. १५ मेपर्यंत सर्व बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे ...

आंब्याचे दर आटोक्यात; निर्बंधांमुळे विक्री मंदावली!
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. १५ मेपर्यंत सर्व बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे व्यापाऱ्यांसोबत फळ विक्रेत्यांचा व्यवसायही ठप्प झाला आहे. या संकटाचा परिणाम आंब्याच्या दरावर झाला. हापूससोबत केशर, लालबाग, दशेरी आंब्याचे दर घटले आहेत. जिल्ह्यात रत्नागिरी हापूस आंब्याचा दर २५० ते ३५० रुपये प्रतिडझन ठोकमध्ये आहे; मात्र विक्री मंदावल्याने आंबा सडण्याच्या मार्गावर आहे. यासह हापूस (कर्नाटक)चा दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो, केशर ६०, लालबाग ३० रुपये आणि दशेरी आंब्यालाही ५० ते ६० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. दरम्यान, कोरोनामुळे कडक निर्बंध लागू झाल्याने व्यावसायिकांकडून नव्याने आंबा बोलावणे बंद झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रशासनाने १५ मेनंतर निर्बंध हटविल्यास, त्यापुढे आंबा विक्रीच्या व्यवसायाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
--बॉक्स--
विक्री ठप्प; आंब्याचे नुकसान
९ मेपर्यंत जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ असे चार तास फळ विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. या काळात अकोला शहरातील फळ विक्रेत्यांनी भरपूर प्रमाणात आंबा उपलब्ध केला; मात्र ९ मे रात्रीपासून कडक निर्बंध लागू झाले. त्यामुळे फळ विक्रीची दुकानेही बंद आहेत. यामुळे हापूससोबतच अन्य प्रजातींचा आंबाही जागेवरच सडत असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली. हापूस आंब्याची मागणी झाल्यास विक्रेत्यांनी घरपोहोच डिलिव्हरीची सोय उपलब्ध केलेली आहे. विशेषत: रत्नागिरीच्या हापूस आंब्याला अधिक मागणी आहे.
--कोट--
आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याची झाडे फळांनी अधिक प्रमाणात लदबदली आहेत. कोरोनामुळे बेभाव आंबा विकावा लागत आहे; परंतु योग्य नियोजन केल्यास यावरही मात करता येते. आम्ही थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नियोजन केले आहे. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
- डॉ. विजय म्हैसने, आंबा उत्पादक
--कोट--
यावर्षी उच्चदर्जाचे गावरान आंबे आले आहेत. या आंब्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र या निर्बंधांमुळे बाजार बंद आहे. हा आंबा विक्री करावा तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्ण आंबा शेतात सडण्यापेक्षा थेट ग्राहकांना विक्री करण्याचा पर्याय आहे.
- रमेश निमकंडे, आंबा उत्पादक
--कोट--
कोरोनामुळे मागील वर्षांपासून आंबा विक्रीत अडचण येत आहे. यावर्षी तरी आंब्याची विक्री होणार असे अपेक्षित होते. परंतु कडक निर्बंधांमुळे बाजार बंद आहे. आंब्याची विक्री ठप्प झाली असून, शहरातील विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात माल पडून आहे. हा आंबा सडल्यास मोठे नुकसान होईल.
- मुजाहीद खान, आंबा व्यापारी
--कोट--
दरवर्षीप्रमाणे यंदाही हापूसला ग्राहकांकडून विशेष मागणी होती. त्यानुसार, मोठ्या प्रमाणात आंब्याच्या पेट्या बोलावल्या होत्या. हापूससह केशर, दशेरी हा आंबाही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. कडक निर्बंधांमुळे विक्री बंद आहे. मालाची आवकही नाही.
- आरीफ चाँद खान, आंबा व्यापारी
--पॉईंटर--
आंब्याची होलसेल किंमत (प्रतिकिलो)
केशर ६०
लालबाग ३०
बदाम ४०
--पाॅईंटर--
हापूस (रत्नागिरी)
२५० रु.
हापूस (कर्नाटक)
८० रु.