मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले!
By Admin | Updated: February 4, 2016 01:28 IST2016-02-04T01:28:48+5:302016-02-04T01:28:48+5:30
मलेरिया, डेंग्यू निदानासाठी ३ लाख ४२ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासले!

मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले!
अकोला: कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी हिवताप विभागाकडून दरवर्षी ग्रामीण व शहरी भागामध्ये नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासले जातात. २0१५ डिसेंबरअखेरपर्यंत हिवताप विभागाने ३ लाख ४२ हजार ७६५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासले. यामध्ये केवळ १७९ जणांना मलेरिया आणि १७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून आले. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले आहेत. जिल्हय़ात मलेरिया, डेंग्यूचा पादुर्भाव वाढू नये. यासाठी हिवताप विभागातर्फे दरवर्षी ग्रामीण व शहरी भागामध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येते. तसेच डबक्यांमध्ये गप्पी मासेसुद्धा सोडण्यात येतात. शहरी व ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर हिवताप विभागाने फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात एक फॉगिंग मशीन आणि शहरात सात फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या माध्यमातून ठिकठिकाणी फवारणीसुद्धा करण्यात येते. गतवर्षी २८ गावांमध्ये फवारणी करण्यात आली होती. तीन वर्षांंपूर्वी दहा ठिकाणी मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचा उद्रेक झाला होता. त्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला; परंतु वर्षभरापासून जिल्हय़ात मलेरिया, डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यात हिवताप विभागाला यश आले आहे. साठलेल्या किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये एडीस इजिप्टाय नामक विषाणूची उत्पत्ती होत असल्याने, डासांचे प्रमाण वाढते आणि मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हिवताप विभागाकडून प्रयत्न करण्यात येतात.