महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचा निर्णय लवकरच!
By Admin | Updated: August 28, 2014 02:20 IST2014-08-28T02:02:39+5:302014-08-28T02:20:14+5:30
विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याची तयारी

महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचा निर्णय लवकरच!
अकोला: विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागा लढविण्याची तयारी भारिप बहुजन महासंघप्रणीत महाराष्ट्र लोकशाही आघाडीने सुरु केली आहे. विविध घटक पक्ष सोबत घेऊन, आघाडीकडून निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी कोणकोणते घटक पक्ष आघाडीत सहभागी होतील, याबाबतचा निर्णय शुक्रवारपर्यंत होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. युती आणि आघाडीच्या राजकारणाचे वारे सर्वच पक्षांमध्ये वेगाने वाहू लागले आहेत. आघाडीच्या या राजकारणात आता भारिप बहुजन महासंघप्रणीत महाराष्ट्र लोकशाही आघाडीनेही उडी घेतली आहे. विविध घटक पक्षांना सोबत घेऊन, महाराष्ट्र लोकशाही आघाडीने राज्यातील विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. या आघाडीत कोणकोणते घटक पक्ष असतील, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट नसले तरी, यासंदर्भातील निर्णय शुक्रवार, २९ ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकशाही आघाडीने राज्यातील ३0 पेक्षा अधिक मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. अकोल्यासह सर्वच जागांवर आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्र लोकशाही आघाडी राज्यातील सर्व जागा लढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी राज्यातील समविचारी घटक पक्षांना आघाडीत सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र लोकशाही आघाडी विविध घटक पक्षांना सोबत घेऊन, राज्यातील सर्व जागा लढणार आहे. आघाडीचे घटक पक्ष कोणकोणते असतील, याबाबतचा निर्णय २९ ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे कार्यालय सचिव ज वि पवार यानी सांगीतले.
*घटक पक्षांच्या निर्णयाकडे लागले लक्ष!
भारिप-बमसंप्रणीत महाराष्ट्र लोकशाही आघाडीत राज्यातील समविचारी घटक पक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न आघाडीकडून सुरु आहेत. प्रामुख्याने समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम) व इतर काही पक्ष आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने घटक पक्षांच्या निर्णयाकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागले आहे.