लुटमार, ‘चेन स्नॅचिंग’च्या घटनांमध्ये वाढ, तपास मात्र शून्य!
By Admin | Updated: November 17, 2014 01:38 IST2014-11-17T01:38:37+5:302014-11-17T01:38:37+5:30
अकोला शहरात गत पाच महिन्यात ‘चेन स्नॅचिंग’च्या सहा तर घरफोडीच्या १६ घटना.

लुटमार, ‘चेन स्नॅचिंग’च्या घटनांमध्ये वाढ, तपास मात्र शून्य!
अकोला: गत चार ते पाच महिन्यांपासून लुटमार, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. घटना घडल्यानंतर पोलिस केवळ अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करतात आणि तपास सुरू असल्याचे सांगतात. मात्र घटना घडून वर्ष, दोन वर्ष उलटून जातात तरी घटनांचा तपासही होत नाही आणि चोरट्यांचा सुगावा लावला जात नाही. गत पाच महिन्यांमध्ये शहरामध्ये लुटमारीच्या चार, चेन स्नॅचिंगच्या सहा, कारमधील लाखोंची रोकड लंपास केल्याच्या चार, घरफोडीच्या १६ आणि दरोड्याच्या दोन घटना घडल्या. परंतु यातील पाच घटना वगळल्या तर इतर घटनांचा तपास करण्यामध्ये पोलिस यंत्रणेला अपयश आले. शहरामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. खंडणी, धमक्यांच्या प्रकारांसोबतच व्यापार्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख लुटून नेण्याच्या घटना वाढल्या. महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली. तसेच घरफोडी व दरोडा घालून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनाही घडल्या. पोलिस ठाण्यामध्ये तक्रारींनुसार आरोपींवर गुन्हा दाखल होतो; परंतु या घटनांचा तपास मात्र वर्षगणती लागत नाही. तक्रारकर्ता पोलिस ठाण्याच्या पायर्या झिजवून कंटाळतो; परंतु त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे.. तपास सुरू आहे. एवढेच सांगून त्याची बोळवण केली जाते. प्रसंगी त्याला शिवीगाळ करून पोलिस ठाण्यामधून हाकलून देण्याचे प्रकार घडतात. या प्रकारांमुळे अनेक नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या भानगडीत पडतदेखील नाहीत.