पोलीस असल्याची बतावणी करून महिलेचे दागिने लुटले!
By Admin | Updated: April 26, 2017 01:38 IST2017-04-26T01:38:00+5:302017-04-26T01:38:00+5:30
अकोला : पूजा करून घरी परत जाणाऱ्या वृद्धेस दोन युवकांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची घटना रजपूतपुरा येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.

पोलीस असल्याची बतावणी करून महिलेचे दागिने लुटले!
अकोला : पूजा करून घरी परत जाणाऱ्या वृद्धेस दोन युवकांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची घटना रजपूतपुरा येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. चेकींग सुरू असून, आपल्याकडील मौल्यवान वस्तु काढा, असे सांगून त्यांच्याकडील ७० हजार रुपयांच्या ४० ग्रॅमच्या चार सोन्याच्या बांगड्या लुटले.
रजपूतपुरा येथील वर्धमान कॉम्प्लेक्समधील रहिवासी रेखा हसमुखलाल शाह (५९) या घराजवळच असलेल्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. पूजा आटोपल्यानंतर त्या परत जात असताना त्यांच्याजवळ दोन युवक आले आणि त्यांनी, समोर पोलिसांची तपासणी सुरू असल्याने तुम्ही तुमच्याकडील दागिने काढून बॅगमध्ये ठेवा, असे सांगितले. सदर महिलेने या दोघांवर विश्वास ठेवत ४० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्या पर्समध्ये ठेवल्या, महिलेने सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवताच या दोन युवकांनी महिलेच्या हातातील पर्स घेऊन पळ काढला, त्यानंतर रेखा शाह यांनी आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत दोन्ही अज्ञात चोरटे पसार झाले. काही वेळातच त्यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनीही घटनास्थळ गाठले; मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून रेखा शाह यांची चौकशी केली; मात्र सदर घटनेमुळे घाबरलेल्या शाह व्यवस्थित माहिती पोलिसांना देऊ शकल्या नाहीत.
सायंकाळी पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावून रेखा शाह यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.