Lok Sabha Election 2019: विकास कामांचे फलक झाकण्यासाठी मनपाची धांदल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:37 IST2019-03-13T13:37:09+5:302019-03-13T13:37:51+5:30
अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच शहरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज, बॅनर हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची चमू सरसावली.

Lok Sabha Election 2019: विकास कामांचे फलक झाकण्यासाठी मनपाची धांदल!
अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच शहरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज, बॅनर हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची चमू सरसावली. दोन दिवसांत शहराच्या कानाकोपऱ्यातील राजकीय होर्डिंग्ज हटविल्यानंतर आता प्रभागात गल्लोगल्लीत लावण्यात आलेल्या विकास कामांचे फलक झाकण्यासाठी मनपाची चांगलीच धांदल उडाली आहे. विकास कामांचे फलक झाकण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचीसुद्धा धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.
‘अमृत’योजनेच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. सिमेंट रस्ते, एलईडी पथदिव्यांसाठी शासनामार्फत कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. यादरम्यान, हद्दवाढीतील विकास कामांसाठी ९७ कोटींच्या निधीतून विकास कामांचा श्रीगणेशा झाला आहे. एकूणच, ही सर्व कामे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेतील सत्तापक्षाने निकाली काढली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर शहरात विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा व उद्घाटनाचा धडाका सुरू होता. आमदारांच्या निधीतून केलेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी होर्डिंग्ज-बॅनर व गल्लीबोळात विकास कामांचे फलक लावण्यात आले. यात भरीस भर शहराच्या विविध भागात अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्याने शहराचे विद्रूपीकरण झाल्याचे चित्र समोर आले. रविवारी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच महापालिक ा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार रविवारी रात्री मुख्य रस्ते, मुख्य चौकांतील राजकीय होर्डिंग्ज-बॅनर हटविण्याची कारवाई करण्यात आली. सोमवारीसुद्धा मुख्य चौक, रस्त्यांवरील होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम सुरू होती. या कामासाठी चारही क्षेत्रीय अधिकारी व अतिक्रमण विभागाची चमू कार्यरत असल्याचे दिसून आले. यादरम्यान, गल्लीबोळात लावण्यात आलेल्या भूमिपूजनाच्या पाट्या,फलकांवर कागद लावणे आवश्यक आहे. अशा फलकांची संख्या जास्त असल्याने महापालिका प्रशासनाच्या यंत्रणेची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र आहे.
पाटी-फलकांना लावले कागद
शहराच्या विविध भागात रस्ते, एलईडी पथदिवे आदी विकास कामांच्या भूमिपूजनाचे व उद्घाटनाचे असंख्य फलक व पाट्या लावण्यात आल्या आहेत. त्यावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख आहे. आचारसंहिता लागू होताच मनपा प्रशासनाने असे फलक व पाट्या झाकण्यासाठी कागदाचा वापर केला. फलकांची संख्या जास्त असल्याने ही मोहीम आणखी दोन दिवस चालणार असल्याचे संकेत आहेत.