महावितरणच्या आयटी विभागाचे लॉक कागदोपत्री
By Admin | Updated: June 13, 2017 00:32 IST2017-06-13T00:32:20+5:302017-06-13T00:32:20+5:30
एकाच ठिकाणाहून मीटरचे रीडिंग; कैलास टेकडी, खदान, सिंधी कॅम्प, गीतानगरमध्ये ओरड

महावितरणच्या आयटी विभागाचे लॉक कागदोपत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (महावितरण) द्वारा ज्या एजन्सीकडून मीटर रीडिंग आणि बिल वाटप सुरू आहे त्यात प्रचंड घोळ झाला आहे. ही बाब लोकमतने प्रकाशीत केल्यानंतर महावितरणचे अकोला परिमंडळाचा मुख्य अभियंता अरविंद भादीकर आणि अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरणच्या आयटी विभागाकडून सिस्टीम लॉक करण्यात आली असून, त्यात छेडछाड करता येत नाही, असे स्पष्ट केले प्रत्यक्षात मात्र महावितरणच्या आयटी विभागाचे लॉक कागदोपत्री असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
निविदेसाठी भांडणाऱ्या दोन एजन्सीच्या वादात अकोला शहरातील १ लाख ३० हजार ग्राहकांना विजेचे अतिरिक्त बिल मिळाले आहे. अव्वाच्या सव्वा मिळणारे वीज बिल वास्तविक नसून, विना रिडिंग घेता अंदाजे काढले जात असल्याच्या अनेक तक्रारी दररोज महावितरण कार्यालयात येत आहेत. तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने महावितरणच्या अधिकारी वैतागले आहेत. एकाच ठिकाणाहून पाचशे-सहाशे ग्राहकांचे मीटर रिडिंग घेतल्या गेल्याचे चित्र जीपीएस सिस्टीममध्ये दर्शविले जात आहे. कैलास टेकडी, सिंधी कॅम्प, खदान, गीतानगर आदी भागातील अनेक ग्राहकांना याचा जबर फटका बसला आहे.
२ एप्रिलपासून १६ मेपर्यंत घेण्यात आलेल्या मीटर रीडिंगमध्ये हा घोळ झालेला आहे. लॅटीट्युट २०-७११ आणि लॉगीट्युट ७६-९९ च्या क्रमांकाची पडताळणी महावितरणने केल्यास बराच प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अरविंद भादीकर आणि दिलीप दोडके यांनी आयटी विभागाकडून चाचपणी करण्याची तयारी मध्यंतरी दशर्विली होती.
आता या चाचपणीची गरज निर्माण झाली आहे. कमी दरात घेतलेली मीटर रीडिंग आणि बिल वाटप निविदा अंगलट आल्याने कंत्राटदाराकडून हा गोंधळ होत आहे. याच धर्तीवर परभणी येथे एका एजन्सीवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. जर अकोल्यातील या प्रकाराची चौकशी झाल्यास येथेही कारवाई होऊ शकते, अशी स्थिती आहे.