थकबाकीदारांना तातडीने कर्ज द्या!

By Admin | Updated: June 17, 2017 01:13 IST2017-06-17T01:13:25+5:302017-06-17T01:13:25+5:30

बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘डीडीआर’चे निर्देश

Loan urgently to the defaulters! | थकबाकीदारांना तातडीने कर्ज द्या!

थकबाकीदारांना तातडीने कर्ज द्या!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यत कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) जी.जी. मावळे यांनी शुक्रवारी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्यासह अटींच्या आधारे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जिल्हा उपनिबंधकांंनी राष्ट्रीयीकृत बँकांचे जिल्ह्यातील समन्वयक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शासन आदेशानुसार ३० जून २०१६ अखेर जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर, १० रुपयांपर्यंत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे यांनी या बैठकीत बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांच्यासह राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कर्जासाठी द्यावे लागणार अर्ज अन् स्वयंघोषणापत्र!
थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळविण्यासाठी संबंधित बँकेकडे कर्ज देण्याबाबत मागणी अर्ज द्यावा लागणार आहे. तसेच थकबाकीदार शेतकरी असून, शासनाच्या अटींचे उल्लंघन होणार नाही, असे स्वयंघोषणापत्र शेतकऱ्यांना बँकेकडे सादर करावे लागणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे यांनी सांगितले.

Web Title: Loan urgently to the defaulters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.