लिज संपलेली दुकाने भुईसपाट
By Admin | Updated: August 1, 2014 02:23 IST2014-08-01T01:42:36+5:302014-08-01T02:23:24+5:30
अकोला मनपाची कारवाई, मालधक्का परिसर मोकळा

लिज संपलेली दुकाने भुईसपाट
अकोला : मनपाच्या अतिक्रमण विभागाने रेल्वे स्थानक परिसरातील मालधक्का तसेच न्यू इंग्लिश स्कूलजवळील लिज संपलेली अतिक्रमित १५ दुकाने गुरुवारी अक्षरश: भुईसपाट केली. तत्पूर्वी सकाळी गणेश घाट परिसरातील मच्छीविक्रेत्यांना हुसकावून लावण्यात आले.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी गणेश घाट परिसरातील मच्छी विक्रेत्यांना व्यावसायिक परवाना नसल्याच्या सबबीखाली हुसकावून लावले. पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाण्याची विक्री करणार्या एका व्यावसायिकाचे अ ितक्रमित दुकान यावेळी काढण्यात आले. दुपारी शिवाजी महाविद्यालय रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपासून ते शिवाजी पार्कपर्यंत रस्त्यालगतचे अतिक्रमण जमीनदोस्त केले. तसेच मालधक्का परिसरातील पक्क्या दुकानांची लिज २00४ मध्ये संपल्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे पाहणीदरम्यान समोर आले. त्यामुळे अकरम गुड्स ट्रान्सपोर्ट, केजीएन गॅरेज, भगवान कुशन, सूर्योदय हॉटेलसह तब्बल १५ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मोटार दुरुस्ती, गॅरेज व्यावसायिकांचा समावेश होता. न्यू इंग्लिश हायस्कूल ते दामले चौक ते संतोषी माता मंदिर रस्त्यावरील दुकाने काढली. ही कारवाई प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्यासह नगर रचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र घनबहाद्दूर, क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड, विद्युत विभागाचे अमोल डोईफोडे, सुरेश अंभोरे, अ ितक्रमण विभागाचे डोंगरे, मिश्रा, बडोणे, मधुकर कांबळे यांनी पार पाडली.