पीकविम्याकडे शेतकर्यांची पाठ
By Admin | Updated: August 19, 2014 00:16 IST2014-08-19T00:16:27+5:302014-08-19T00:16:27+5:30
गतवर्षी १.६0 लाख विमाधारक शेतकरी : यावर्षी केवळ ६९ हजार शेतकर्यांचा विमा

पीकविम्याकडे शेतकर्यांची पाठ
वाशिम: २0१३-१४ च्या खरीप पीक विमा योजनेंतर्गत अपेक्षीत नुकसानभरपाई पदरी न पडल्याच्या धक्क्यातून जिल्ह्यातील शेतकरी अजूनही सावरला नसल्याची बाब समोर येत आहे. गतवर्षी १ लाख ५९ हजार ६८९ शेतकर्यांनी विमा उतरविला होता. यावर्षी मात्र केवळ ६९ हजार शेतकर्यांनी खरीप पिकांचा विमा काढला आहे. कृषीप्रधान देशातील शेतकरी चोहोबाजूंनी येणार्या नैसर्गिक व मानवी संकटांनी खचून जात आहे. नैसर्गिक व मानवी संकटांच्या मालिकेतून स्वत:ला सावरत असलेल्या शेतकर्यांचा उद्योजक व व्यापार्यांकडूनदेखील 'हिरमोड' होत असतो. नैसर्गिक आपत्तीत सापडणार्या पिकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना आणली आहे. गतवर्षी २0१३-१४ च्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ६८९ शेतकर्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता. यापैकी केवळ ५१ हजार ४९0 शेतकर्यांना नुकसानभरपाईच्या यादीत स्थान मिळाले होते. अतवृष्टी आणि गारपीटीने रिसोड तालुक्यातील शेतकर्यांना अक्षरश: झोडपले होते. मात्र, मूग पिकाचा अपवाद वगळता उर्वरीत कोणत्याच पिकाचा विमा शेतकर्यांना मिळाला नाही. गतवर्षीचा अनुभव आणि यावर्षीचे कोरड्या दुष्काळाचे संकट बघून सुरूवातीपासून जिल्ह्यातील शेतकर्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविली होती. कृषी विभागाने जनजागृती करून पीक विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ३१ जुलैची अंतिम मुदत १६ ऑगस्टपर्यंत वाढविली. मात्र, शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करण्यात विमा कंपनी व कृषी विभागाला अपेक्षीत यश न आल्याने विमा काढणार्या शेतकर्यांची संख्या यावर्षी जवळपास ९0 हजाराने घटली. विमा कंपनीच्या जाचक अटी, गतवर्षीच्या अतवृष्टीनंतरही विमा योजनेचा लाभ न मिळणे आणि यावर्षीची दुष्काळसदृश्य स्थिती या वास्तवतेच्या ओझ्याखाली पीक विमा योजनेची जनजागृती मोहिम अक्षरश: दबून गेली. १६ ऑगस्टच्या अंतिम मुदतीनंतर हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील केवळ ६९ हजार शेतकर्यांनी खरीप पीक विमा काढला आहे.