भूमी अभिलेखचे कर्मचारी संपावर
By Admin | Updated: August 20, 2014 00:17 IST2014-08-20T00:17:22+5:302014-08-20T00:17:22+5:30
तांत्रिक खाते म्हणून मान्यता द्यावी, यासह विविध मागण्यांकरिता भूमी अभिलेखचे कर्मचारी १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

भूमी अभिलेखचे कर्मचारी संपावर
अकोला : भूमी अभिलेख विभागाला तांत्रिक खाते म्हणून मान्यता द्यावी, यासह विविध मागण्यांकरिता भूमी अभिलेखचे कर्मचारी १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे जिल्ह्यात शेतजमीन मोजणीसह फेरफार आणि भूसंपादनाची कामे ठप्प झाली आहेत. भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे दिले होते. त्यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष न दिल्याने अखेर कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. १६ ऑगस्टपासून भूमी अभिलेख विभागाची सर्व कामे ठप्प आहेत. जिल्ह्यातील वर्ग ३ आणि ४ चे १७0 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या कर्मचार्यांनी तांत्रिक खाते म्हणून मान्यता, सर्व कर्मचार्यांना तांत्रिक कर्मचार्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी आदीसह प्रमुख १५ मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. राज्यव्यापी संपामुळे भूमी अभिलेख विभागातर्फे केली जाणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत. यात शेतजमीन मोजणी, नगर भूमापनाची मोजणी, मिळकत पत्रिकाच्या नकला, फेरफार नोंदी, भूसंपादनाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष विशाल वरखडे, सचिव जितेंद्र शिंदे, गणेश सोळंके, विनोद जाधव, नितीन पारधी, अनिल देशमुख, भारत गवई, शरद पोटेकर, प्रसाद पांडे, आशा परतेकी, पुनम देवाते आदींनी सहभाग घेतला आहे.