कृष्णा मिश्रा ठरला विदर्भवीर खिताबाचा मानकरी
By Admin | Updated: May 27, 2017 00:52 IST2017-05-27T00:52:21+5:302017-05-27T00:52:21+5:30
विदर्भस्तरीय विदर्भवीर कुस्ती स्पर्धा

कृष्णा मिश्रा ठरला विदर्भवीर खिताबाचा मानकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे शुक्रवारी सायंकाळी विदर्भवीर कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आमदार गोपीकिसन बाजोरिया यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे आयोजन अकोला जिल्हा कुस्तीगीर परिषद अंतर्गत जय अंबे मॉ बहूद्देशीय संस्था व पंचमुखी हनुमान क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौजन्याने केले. स्पर्धेत एकूण २०० लढती झाल्या. त्यापैकी १८० जोड व २० खड्या (इनामी) कुस्ती लागल्या.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदू युथ जिमकोचे संस्थापक चंद्रशेखर गाडगीळ होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर विजय अग्रवाल, स्थायी शिक्षण सभापती बाळ टाले, नगरसेवक राजेश मिश्रा, नगरसेवक सतीश ढगे, डब्बू सेठ, अजय शर्मा, गजानन चव्हाण, माजी नगरसेवक विलास शेळके, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, विदर्भकेसरी नजीर पहेलवान, नाना गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अकोल्याची रेणुका पारसकर आणि वाशिमची कुमारी गादेकर यांच्यात खडी कुस्ती लावण्यात आली. ही या स्पर्धेतील एकमेव महिला गटाची कुस्ती होती. आमदार बाजोरिया यांनी आपल्या भाषणात अकोला जिल्ह्याची पहिलवानांचा जिल्हा म्हणून ओळख होती. ही ओळख धूसर होत चालली होती; मात्र अशा स्पर्धांच्या आयोजनामुळे निश्चितच कुस्तीचे गतवैभव व धूसर होत चाललेली ओळख परत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. मान्यवरांचे स्वागत आयोजन समितीचे मनोज मिश्रा, नितीन मिश्रा यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून महेंद्र मलिये, शिवा सिरसाट, मनोज तायडे, धीरज चतरकर, नारायण नागे, कुणाल माधवे, मंगेश अंभोरे, राजेश राजनकर, राजेश नेरकर यांनी जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांच्या मार्गदर्शनात काम पाहिले.
आदिनाथ भोयर व शोएब खानची कुस्ती
आंतरराष्ट्रीय मल्ल आदिनाथ भोयर, वाशिम व विदर्भकेसरी २०१७ चा विजेता शोएब खान, अमरावती यांच्यामधील खेळ प्रेक्षणीय ठरला. आदिनाथ हा मूळचा वाशिमचा असून, सध्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, पुणे तालीम करीत आहे. याशिवाय संकेत जाधव वाशिम, सोनू नागे अकोला, भावेश भिरड अकोला, बजरंग इंगळे, कृष्णा घोडके, तुषार भिरड, अजय इंगळे, सुमित नागे, आकाश साठे, दीपक शेंडे, नाराण नागे, नीलेश दमाने, गुलाम ख्वाजा, योगेश माधवे यांचाही खेळ चांगला झाला.
नदीमने केली प्रेक्षकांची निराशा
विदर्भकेसरी २०१६ चा विजेता नदीम खान याचा खेळ बघण्यासाठी कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती; मात्र अमरावतीहून स्पर्धेकरिता येताना अपघात झाल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली. यामुळे तो स्पर्धेत खेळू शकला नसल्याने प्रेक्षकांची निराशा झाली. आयोजकांनी नदीमचा स्पर्धास्थळी यथोचित सन्मान केला.
कृष्णा मिश्राने चीतपट लढत जिंकली!
स्पर्धेतील खिताबी लढत नागपूर विद्यापीठाचा कलर होल्डर तथा विदर्भ चॅम्पियन कृष्णा मिश्रा (अकोला) आणि राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा विजेता स्वप्निल उतखडे (अमरावती) यांच्यात झाली. कृष्णा मिश्राने चीतपट करीत स्पर्धा जिंकली. कृष्णाला चांदीची गदा व विदर्भवीर हा मानाचा खिताब व रोख राशी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार गोपीकिसन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, श्रीरंग पिंजरकर, तरुण बगेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.