कपाशीवर ‘मिलिबग’चा प्रादुर्भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:04 IST2017-08-28T01:04:36+5:302017-08-28T01:04:49+5:30
हिवरखेड : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणार्या हिवरखेड परिसरात कापूस पिकावर आता ‘मिलिबग’ या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीमुळे शेकडो एकरातील मान्सूनपूर्व कपाशी संकटात सापडली आहे.

कपाशीवर ‘मिलिबग’चा प्रादुर्भाव!
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणार्या हिवरखेड परिसरात कापूस पिकावर आता ‘मिलिबग’ या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीमुळे शेकडो एकरातील मान्सूनपूर्व कपाशी संकटात सापडली आहे.
हिवरखेड परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मान्सूनपूर्व कपाशीची ५0 ते ६0 हेक्टरच्यावर लागवड करण्यात आली आहे. आधीच पावसाने दडी मारल्यानंतर शेतकर्यांचा जीव टांगणीला लागला असताना या पिकावर ‘मिलिबग’ किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. यामुळे कपाशीच्या उत्पादनाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून शेतकर्यांच्या शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. त्यातच दर एकरी उत्पन्न कमी येत असल्याने व शेतमालास भाव कमी मिळत असल्याने शेतमालाच्या विक्रीतून फारशी रक्कम मिळत नसल्याने लागवड, मशागतीवर झालेला खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ लागत नाही. अशा स्थितीतही या परिसरातील कापूस उत्पादक शेतकर्यांनी शेतातील अर्धा भाग मान्सूनपूर्व कपाशीसाठी राखून ठेवला आहे. शेतकर्यांनी मोठमोठय़ा कंपन्यांच्या आश्वासनाला बळी पडून नामांकित कंपन्यांचे कपाशी बियाणे पेरले आहे. या कपाशीच्या झाडाच्या शेंड्यावर ‘मिलिबग’ या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीमुळे पूर्ण झाड वाळू शकते. पर्हाटी फुलपातीवर आली असताना या किडीच्या आक्रमणाने शेतकरी हवालदिल झाला आहे. हिरवीगार पर्हाटी वाळतील, असे चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याचे काम कृ षी विभागाने करणे गरजेचे असताना कृ षी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतशिवारात जाऊन शेतकर्यांची माहिती घेत नाहीत. फक्त ऑफिसमध्ये बसून माहिती गोळा करीत असून, त्यांनी शेतकरी वार्यावर सोडला असल्याचे शेतकरी बोलत आहेत. शेतामध्ये जाऊन शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असताना एकही कर्मचारी, अधिकारी येथे कपाशीच्या शेतांकडे फिरकला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शिर्ला परिसरात सोयाबीनला शेंगाच आल्या नाहीत!
शिर्ला परिसरात अनेक शेतकर्यांच्या शेतात पेरलेल्या सोयाबीनला शेंगाच आल्या नाहीत. त्यामुळे, शेतकर्यांसमोर आणखी नवे आर्थिक संकट उभे आहे. शिर्ला क्षेत्रातील चारही भागातील सोयाबीनची पाहणी केली असता सोयाबीनला शेंगा धरल्याच नसल्याचे चित्र आहे. पावसाने दांडी मारल्याने शेतकर्यांनी तिबार पेरणी केली. तिबार पेरणी करूनही अनेकांच्या शेतात उगवलेल्या सोयाबीनला शेंगाच आल्या नाही. शेतकर्यांना पेरणीसाठी एकरी ८ हजार रुपये खर्च आला तर उत्पादन एकरी किमान ३0 हजार रुपयांचे होण्याची अपेक्षा होती; मात्र सोयाबीन पिकाला शेंगाच धरल्या नसल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
परिसरातील विलास सूर्यभान इंगळे, मधुकर हिरामण बळकार, लक्ष्मण खंडुजी ढाळे, भास्कर वसतकार, दयाराम वरणकार यांच्यासह इतरांच्या शेतात हा प्रकार उघडकीस आला आहे. आरंभीच पावसाचा अभाव, उलटलेली तिबार पेरणी, घटलेली उत्पादनक्षमता; मात्र आता तर सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शिर्लाच्या बहुतांश क्षेत्रावर ही अवस्था कायम आहे. त्यामुळे न सावरले जाणारे आर्थिक संकट शेतकर्यांना सहन करावे लागणार आहे.
शेतकरी धडकणार तालुका कृषी कार्यालयावर!
सोयाबीन पिकानेही पाठ फिरवल्याने शेतकरी तालुका कृषी कार्यालयांवर धडक देणार असल्याची माहिती आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्यांसमोर नवे संकट उभे आहे. ज्या शेतकर्यांच्या शेतात सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत त्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.
बेलखेड येथे मुगासोबत उडिदाला शेंगाच लागल्या नाही!
बेलखेड परिसरातील शेतांमध्ये अल्प पावसामुळे मूग, उडीद, कपाशी, तुरीची पिके पिवळी पडली आहेत. उडिदाच्या झाडांना कमी पावसामुळे शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकर्याने उडिदाच्या पीक पिवळे होण्यासोबतच शेंगा लागल्या नसल्यामुळे दोन एकरातील उडीद पीक मजूर लावून उपटून टाकले.