Killed on the spot in an accident on the national highway | राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एक जागीच ठार

राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एक जागीच ठार

बाळापूर : बाळापूरहून अकोला येथे जात असलेल्या दुचाकीसमोर गुरे आल्याने दुचाकीवरील एक जण खाली पडला. त्यामागे भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने त्यास चिरडल्याची घटना रविवार, २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर व्याळानजीक घडली. या अपघातात मधुकर डोंगरे याचा जागीच मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मीकांत नारायण वाघमारे, रा. सिंधी कॅम्प शास्त्रीनगर, अकोला व त्याचा मित्र मृतक मधुकर डोंगरे हे एमएच ३० जी. ४६६९ ने पारस येथे बाबूजी महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ते बाळापूरहून अकोलाकडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावर व्याळानजीक श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सनजीक त्यांच्या दुचाकीसमोर म्हैस आली. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण मिळविण्यासाठी दुचाकीचालक लक्ष्मीकांत वाघमारे याने ब्रेक लावले. यामुळे तोल जाऊन मागे बसलेला त्याचा मित्र मधुकर डोंगरे हा खाली पडला. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने त्यास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मीकांत वाघमारे याने बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३३७, ३, ४, अ भादंवि १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहे.

 

Web Title: Killed on the spot in an accident on the national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.