‘जलयुक्त शिवार’मध्ये अमरावती विभागातील ९५0 गावांचा नव्याने समावेश
By Admin | Updated: January 30, 2016 02:19 IST2016-01-30T02:19:54+5:302016-01-30T02:19:54+5:30
२0१६- १७ या सत्रासाठी ९५0 गावांचा लक्ष्यांक निर्धारित.

‘जलयुक्त शिवार’मध्ये अमरावती विभागातील ९५0 गावांचा नव्याने समावेश
दादाराव गायकवाड / कारंजा लाड (जि. वाशिम): राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात अमरावती विभागासाठी २0१६- १७ या सत्रासाठी ९५0 गावांचा लक्ष्यांक निर्धारित करण्यात आला आहे. राज्यात जवळपास ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. गतवर्षी राज्यातील १८८ तालुक्यांतील २ हजार २३४ गावांतील भूजल पातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे निदर्शनास आले होते. राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे सातत्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. त्यामुळेच राज्यात मागील चार दशकांत कोरडवाहूू क्षेत्रातील पीक उत्पादनात मोठय़ा प्रमाणात चढउतार दिसून आला आहे. यासाठी पाण्याची कमतरता हाच मुख्य घटक कारणीभूत असल्याचे दिसून येते. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत पाणलोट क्षेत्राची कामे करणे, साखळी सिमेंट नाला बंधार्याचे रुंदीकरण/खोलीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्र्जीवन करणे, अस्तित्वातील लघू पाटबंधारे संरचनांची दुरुस्ती करण्याची कामे करण्यात येत आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अमरावती विभागातील १ हजार ३९६ गावांची निवड करण्यात आली आणि या सर्व गावांत जलयुक्त शिवार अभियानाची कामेही सुरू करण्यात आली. आता या अभियानांतर्गत २0१५-१६ या सत्रासाठी आणखी काही गावांचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयानुसार अमरावती विभागासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नव्याने ९५0 गावांचा लक्ष्यांक निर्धारित करण्यात आला आहे. विभागातील पाच जिल्ह्यांतील मिळून नव्या ९५0 गावांत जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यात येतील. यासाठी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या अधिकार कक्षेनुसार विविध जिल्ह्यांचे लक्ष्य निर्धारित केले असून, या लक्ष्यात ऐनवेळी होणारे बदल लक्षात घेता २५ गावे शिल्लक ठेवली आहेत. दरम्यान, या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून, त्यापैकी काही निधी अमरावती विभागाला प्राप्त झाल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून मिळाली आहे. जलयुक्त शिवारातील नव्या गावांची जिल्हावार संख्या १) अमरावती २२५ २) यवतमाळ २२५ ३) बुलडाणा २२५ ४) वाशिम १२५ ५) अकोला १२५ ६) इतर २५