परतीचा पाऊस बरसला; जिल्ह्याला यलो अलर्ट
By रवी दामोदर | Updated: September 29, 2023 18:50 IST2023-09-29T18:50:29+5:302023-09-29T18:50:58+5:30
व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली होती.

परतीचा पाऊस बरसला; जिल्ह्याला यलो अलर्ट
रवी दामोदर, अकोला : हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार, परतीचा पाऊस मुसळधार बरसण्याचा अंदाज आहे. शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, सायंकाळी ६.१० वाजताच्या सुमारास शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठेत सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली होती.
यंदाच्या पावसाळ्यातील सुरुवातीचा जून महिना बहुतांशी कोरडा गेला. त्यामुळे पेरणीला तुलनेने विलंब झाला. जुलै महिन्यात पावसाने साथ दिल्याने पेरणीची कामे आटोपण्यात आली; मात्र ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे पिके धोक्यात सापडली होती. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीपासून पावसाचा धडाका सुरू आहे. जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. तो पिकांसाठी अजिबात पोषक नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सोयाबीनवर आधीच पिवळा मोझॅक येऊन उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असताना आता अतिपाण्याने संकटात अधिकच भर पडणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेउु नये. पुरस्थितीत पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल/रस्ता ओलांडु नये. नदी-नाला काठावर सेल्फी काढण्याचा मोह करु नये. पुरस्थितीत उंच ठिकाणी आश्रय घ्यावा. गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचना प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना देण्यात आली आहे.