विदर्भात प्रथमच सोलर पॅनलद्वारे शेतावर सिंचन!
By Admin | Updated: March 2, 2015 01:18 IST2015-03-01T21:10:17+5:302015-03-02T01:18:24+5:30
पारंपरिक विजेपासून मुक्तता, अपारंपरिक विजेवर पाच एकरावर ओलित.

विदर्भात प्रथमच सोलर पॅनलद्वारे शेतावर सिंचन!
अकोला : भारनियमनामुळे होणार्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी,विदर्भातील शेतकरी अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरण्यावर भर देत आहेत. विदर्भातील पहिल्या सोलर पॅनलचा उपयोग करू न यवतमाळ जिल्हय़ातील लासिना गावच्या शेतकरी महिलेने पाच एकर शेतावर यशस्वी सिंचन केले आहे.
विदर्भातील कृषिपंपाचा अनुशेष प्रचंड वाढला आहे. वीज उपलब्ध असूनही ग्रामीण भागात सातत्याने १६ ते १८ तासांचे भारनियमन होत असल्याने शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा निर्णय विदर्भातील शेतकर्यांनी घेतला असून, कृषी क्षेत्रात सोलर पॅनलची सुरुवात यवतमाळ जिल्हय़ातून झाली आहे. या जिल्हय़ातील नीना हरीश त्रिवेदी या शेतकरी महिलेने पाच एकर शेतात साडेतीन अश्वशक्तीचे १४ सोलर पॅनल लावले आहेत. या पॅनलपासून त्यांना ३३६0 मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. यावर्षी त्यांनी पाच एकरावर सेंद्रिय पद्धतीने डाळिंब फळ पिकाची लागवड केली आहे. हे सोलर पॅनल सूर्याच्या कलाप्रमाणे वळत (ऑटो सिस्टीम) सकाळी ७ ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत शेतकर्यांना या सोलरपासून वीजपुरवठा होत असल्याने या शेतकरी महिलेची भारनियमनातून कायमची सुटका झाली आहे. या १४ सोलर पॅनलचा खर्च नीना त्रिवेदी यांना जवळपास ९ लाख रुपये आला आहे. खर्च सुरुवातीला मोठा वाटत असला तरी या सोलरपासून येणारी २0 वर्ष कुठलाही व्यत्यय न येता वीज उपलब्ध होणार आहे. या एका सोलरपासून २.१४ मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. असे १४ पॅनल येथे असून, यामध्ये वाढ करता येते म्हणजे ७.५ अश्वशक्तीपर्यंत या सोलरची क्षमता वाढवता येते.
सतत होणारे भारनियम आणि परिणामी सोसावे लागणारे पिकांचे नुकसान, यावर उपाय म्हणून कृषी सोलर पॅनल यशस्वी ठरले असल्याची प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील महिला शेतकरी लीना त्रिवेदी यांनी दिली. राज्याचे सोलर पॅनल तज्ज्ञ अशोक अग्रवाल यांनी विदर्भात आता सोलर पॅनलची मागणी वाढत असून, विजेवर शेतकर्यांना चांगला पर्याय उपलब्ध झाला असल्याचे सांगीतले.