तूर खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी !
By Admin | Updated: June 16, 2017 00:58 IST2017-06-16T00:58:09+5:302017-06-16T00:58:09+5:30
जिल्ह्यातील ७८ व्यापाऱ्यांना नोटिस

तूर खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी !
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील तूर खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी करण्यात येत असून, सहकारी उपनिबंधक कार्यालयामार्फत तालुका स्तरावरील सहकारी उपनिबंधक समितीद्वारे या चौकशीला वेग आला आहे. यासंदर्भात ७८ व्यापाऱ्यांना नोटिस बजावण्यात आल्याचे वृत्त आहे.
यावर्षी सुरुवातीला बाजारात तूर खरेदीत शेतकऱ्यांची प्रचंड लूट झाली. ही लूट थांबविण्यासाठी राष्ट्रीय कृषी उत्पादन विकास महामंडळाद्वारे (नाफेड) तूर खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यानंतर राज्यासह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेडने तूर खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रावर हमीदराने तूर खरेदी करण्याचे आदेश असले, तरी प्रतवारीचे निकष लावून येथे तूर खरेदी करण्यात आली. हीच तूर नंतर कमी किमतीत व्यापाऱ्यांनी खरेदी केली. तीच तूर पुन्हा नाफेडला विकण्यात आल्याचे आरोप झाले. यासंदर्भात भारत कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर यांनी शासनाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार शासनाने तूर खरेदी-विक्री व्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत तालुका उपनिबंधक यांच्याकरवी सुरू झाली आहे.
यासंदर्भात बार्शीटाकळी व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन व अकोला येथे एक तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्राप्त झाली. यानुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत तालुका उपनिबंधक समितीमार्फत अकोला येथील ६५ व मूर्तिजापूर येथील १३ व्यापाऱ्यांना नोटिस देण्यात आली असल्याचे वृत्त आहे. अकोट व तेल्हारा येथील व्यापाऱ्यांनाही याबाबत नोटिस देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.