शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 03:52 PM2019-11-12T15:52:59+5:302019-11-12T15:53:50+5:30

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी प्रथमच भाजप शिक्षक आघाडीही कामाला लागली आहे.

Interested Front For Teachers Constituency! | शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी!

शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी!

Next

- नितीन गव्हाळे  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिक्षक संघटनांचे इच्छुक नेते कामाला लागले आहेत. त्यांनी मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिक्षक मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. शिक्षक संघटनांसोबतच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी प्रथमच भाजप शिक्षक आघाडीही कामाला लागली आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे श्रीकांत देशपांडे हे आमदार आहेत. यापूर्वी दोन टर्म हा मतदारसंघ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वसंतराव खोटरे यांच्या ताब्यात होता; परंतु विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात फूट पडल्यामुळे खोटरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गत पाच वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये मोठे बदल झाले आहेत.
या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी अनेक शिक्षक नेते इच्छुक आहेत. प्रथमच भाजपच्या शिक्षक आघाडीची यवतमाळचे नितीन खर्चे यांनी मतदारसंघात बांधणी केली असून, त्यांनी भाजपकडे या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. खर्चे हे अभाविपचे माजी प्रांताध्यक्ष आहेत. यासोबतच विजुक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे यांनीही जोरदार तयारी चालविली आहे.
शिक्षक आघाडीकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे हे पुन्हा नशीब आजमावणार आहेत. देशपांडे यांच्याविषयी शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना शिक्षक मतदार यंदा कशी साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच शिक्षक महासंघाकडून शेखर भोयर गत काही वर्षांपासून तयारी करीत आहेत. एवढेच नाही तर माजी आमदार यू.व्ही. डायगव्हाणे यांची विमाशिसं, माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्या पश्चिम विदर्भ माध्य. शिक्षक संघाकडून विकास सावरकर हे इच्छुक आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक सेना, नुटासुद्धा शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत; परंतु शिक्षक परिषद, नुटा, शिक्षक सेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. भाजप शिक्षक आघाडी रिंगणात उतरणार असल्याने, शिक्षक परिषदेची काय भूमिका राहणार आहे, याकडे लक्ष वेधल्या गेले आहे.


उमेदवारी आणखी नावे चर्चेत!
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी अमरावतीच्या संगीता शिंदे, रमेश चांदूरकर, वाशिमचे किरण सरनाईक, राजकुमार बोनकिले या शिक्षक नेत्यांचीसुद्धा नावे चर्चेत आहेत.


या संघटनांमध्ये युती झाली तर...
पदवीधर मतदारसंघात बी.टी. देशमुख हे पाच वेळा आमदार होते. वसंतराव खोटरे हे १० वर्ष आमदार होते. पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये नुटा, विमाशिसं, विजुक्टा अशी युती असायची, त्यामुळे दोन्ही मतदारसंघात त्यांचा दबदबा होता. कालांतराने या संघटनांमध्ये फूट पडली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा शिक्षक मतदारसंघासाठी या संघटना पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. या संघटना एकत्र आल्या तर चित्र वेगळे राहू शकते.

 

Web Title: Interested Front For Teachers Constituency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.