गरज संपताच रुग्णसेवा थांबविण्याचे दिले निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 10:46 AM2021-06-27T10:46:21+5:302021-06-27T10:46:28+5:30

Akola GMC News : रुग्णालयांमध्ये कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा रोजगार जाणार आहे.

Instructed to stop service as soon as the need arises! | गरज संपताच रुग्णसेवा थांबविण्याचे दिले निर्देश!

गरज संपताच रुग्णसेवा थांबविण्याचे दिले निर्देश!

Next

अकोला : कोविडची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्याने कंत्राटी तत्त्वावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्ये कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा रोजगार जाणार आहे. गरज संपताच नोकरीवरून काढल्याने आता आमच्या संसाराचा गाडा चालणार तरी कसा, असा सवाल कोविडकाळात रुग्णसेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. कोविडच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेने चिंता वाढविली होती. गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने उपलब्ध मनुष्यबळ कमी पडू लागले होते. अशा परिस्थितीत आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेतील कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णसेवा केली; मात्र आता कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी गरज नाही, अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा थांबविण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेमार्फत दिले जात आहेत. गरज संपताच नोकरीवरून काढल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नियुक्त कंत्राटी कर्मचारी- २५०

 

येथील कर्मचाऱ्यांचे गेले रोजगार

केंद्र             - कर्मचारी संख्या

गुणवंत बॉइज हॉस्टेल - ९

 

आरकेटी कॉलेज - ९

 

जीएमसीतील ७० कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात सुमारे ७० वॉर्डबॉय, वर्ग चार श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली होती. कोविडकाळात या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावत रुग्णसेवा दिली. यातील काही कर्मचाऱ्यांंना १ जुलैपासून आपली सेवा थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

गरज सरो, वैद्य मरो

सर्वजण कोरोनाला घाबरत होते, त्यावेळी आम्ही जिवाची पर्वा न करता कोविड वॉर्डमध्ये सेवा दिली. या निमित्ताने आम्हालाही रोजगार मिळाला, मात्र आता प्रशासनाची गरज संपल्याने आम्हाला नोकरीवरून काढण्याचे निर्देश दिले जात आहेत. मागील एक ते दीड वर्षांपासून रुग्णसेवा देत आहोत, प्रशासनाने आमच्या विषयी सकारात्मक विचार करावा.

- राहुल तायडे, कंत्राटी कर्मचारी, जीएमसी, अकोला

जे कोविड केअर सेंटर बंद झाले आहेत, अशा सेंटरवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढल्यास या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेची संधी दिली जाईल.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: Instructed to stop service as soon as the need arises!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.