महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून अकोल्यात ५0 वर्षांपासून सूतकताई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:00 IST2018-10-02T13:00:35+5:302018-10-02T13:00:43+5:30

महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून अकोल्यात ५0 वर्षांपासून सूतकताई!
अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधींचा देश म्हणून आपल्या देशाला ओळख आहे. गांधीजींनी अस्पृश्यता, स्वदेशी, खादी, स्वावलंबनाचा मंत्र जगाला दिला. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कापसातूनच स्वदेशी कापड निर्माण व्हावे यासाठी सूतकताईची प्रेरणा त्यांना दिली. गांधी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून अकोला शहरात ५0 वर्षांपासून अविरत सूतकताईचा यज्ञ सुरू आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीला १५0 वर्ष पूर्ण होत असल्याने, सर्वोदयी मंडळाच्या माध्यमातून गांधीजींच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे.
महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांनी देशाला स्वदेशीचा मंत्र दिला. विदेशी कपड्यांची होळी करून त्यांनी सूतकताई करून बनविलेले कापड आजीवन परिधान केले आणि भारतीयांमध्ये सूतकताईची प्रेरणा जागविली. गांधी विचारांनी प्रेरित होऊन ५0 वर्षांपासून अकोल्यातील सर्वोदयी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण म्हणून सूतकताईचा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवला आहे. मार्च १९४८ मध्ये थोर गांधीवादी विनोबा भावे यांच्या अध्यक्षतेखाली गांधींचा विचार म्हणजे सर्वोदय (सर्वांचा उदय) मनामनात रुजविण्यासाठी सर्वोदय मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या माध्यमातून गांधीजींना अभिप्रेत अस्पृश्यता निवारण, सूतकताई, खादी ग्रामोद्योग, खेड्यांचा विकास, स्वदेशी, निसर्गोपचारसारखे विचारांना घेऊन कामास सुरू झाली. भूदान, ग्रामदान चळवळ उभी झाली. भूदानातून ४७ लाख एकर जमीन मिळवून गोरगरिबांना ती वाटण्यात आली. यातून अनेक गोरगरिबांचा उत्कर्ष झाला. गावागावांमध्ये सर्वोदय मंडळ सुरू झाले आणि गांधीजींच्या विचारांचा जागर सुरू झाला. (प्रतिनिधी)
अॅड. राजपूतांनी दिली पाच एकर जमीन
गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेले अॅड. रामसिंह राजपूत यांनी त्या काळी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभागी होऊन स्वत:ची पाच एकर जमीन देऊन टाकली. एवढेच नाही तर अॅड. राजपूत गांधीजींचा विचार आजसुद्धा आचरणात आणत आहेत. त्यांच्यासह केळीवेळीचे रामकृष्ण आढे, डॉ. शि.ना. ठाकूर, वसंतराव केदार, महादेवराव भुईभार, प्रल्हादराव नेमाडे, बबनराव कानकिरड आदी सर्वोदयी कार्यकर्ते स्वत: सूतकताई करून तयार केलेलेच खादी कपडे परिधान करीत आहेत.
१५0 निसर्गोपचार डॉक्टर तयार करण्याचा संकल्प
गांधीजी निसर्गोचाराचे पुरस्कर्ते होते. यंदा त्यांच्या जयंतीला १५0 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सर्वोदय मंडळाने जिल्ह्यात १५0 निसर्गोपचार डॉक्टर तयार करण्याचा संकल्प केला आहे. २ ते ८ आॅक्टोबरदरम्यान गावांमध्ये स्वदेशी, खादी, निसर्गोपचार, ग्रामोद्योगाविषयी जनजागरण करण्यात येणार आहे.
सूतकताई व चरखा प्रशिक्षण
२ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधी-जवाहर बागेत सूतकताई यज्ञ व अंबर चरखा प्रशिक्षण होईल. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शि. ना. ठाकूर यांनी कळविले.
महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा
२ आक्टोबर २०१८ मंगळवार रोजी विधानसभा अकोला पश्चिम आणि अकोला पूर्व या दोन्ही विधानसभांमध्ये महात्मा गांधी जयंतीच्या पावन दिनी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा निघणार आहे. सकाळी ७ वाजता श्री शिवाजी महाराज स्मारक पुतळा, मोठी उमरी येथे पुतळ्याची स्वच्छता करून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रेत खा. अॅड. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल उपस्थित राहतील, असे भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी कळविले.
गोणापुरातून आमदार सावरकर यांची पदयात्रा
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती भाजपतर्फे साजरी होणार असून, सकाळी १० वाजता अकोला तालुक्यातील गोणापूर-दापुरा मजलापूर येथे आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघणार आहे, असे तालुकाध्यक्ष अनिल गावंडे यांनी कळविले.