Increase in number of students in Degaon School due to innovative activities | नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे देगावच्या शाळेत विद्यार्थी संख्येत वाढ
नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे देगावच्या शाळेत विद्यार्थी संख्येत वाढ

वाडेगाव: बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्यामुळे विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे.
या उपक्रमात लहान मुलांची बचत बँक व हेल्प बॉक्स हा उपक्रम सातत्यपूर्ण राबविला जात आहे. या शाळेत दर्जेदार शिक्षण दिल्या जात असल्याने खासगी कॉन्व्हेंटमधील दाखल विद्यार्थ्यांचा ओढा येथील जिल्हा परिषदेकडे वाढलेला आहे. गावातील व परिसरातील सर्वच विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून, येथील १०० टक्के पटनोंदणी केली जाते. या गावात शाळाबाह्य विद्यार्थी एकही आढळून आल्याने दिसत नाही.
पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांबाबत चर्चा केल्या जातात व पालकांच्या शंकांचे निरसन केल्या जाते. प्लास्टिक निर्मूलन, स्वच्छता अभियान, झाडे लावा-झाडे जगवा, स्वच्छ भारत अभियान यानुषंगाने सर्व शालेय कार्यक्रम शाळेत राबविले जातात. हेल्प बॉक्सच्या माध्यमातून पूरग्रस्तांना २ हजार ७५१ रुपयांची मदत केली गेली. त्याचबरोबर खुशी ठाकरे या विद्यार्थिनीच्या थॅलेसीमियाकरिता सात हजारांची मदत देण्यात आली. त्याचबरोबर गरीब व होतकरू मुलांना त्यातून साहित्य वाटप केले जाते.


विविध स्पर्धांच्या माध्यमातून विकास
२००० ते २०१४ या पासून शाळेमध्ये आमूलाग्र बदल झाला असून, विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दर्जा उंचावला. भौतिक सुविधांची पूर्तता केली जाते. विविध स्पर्धा घेऊन २६ जानेवारी रोजी प्रत्येकी २५१ रोख बक्षीस त्यामध्ये वक्तृ त्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, लेखन निर्मिती, शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा, पाककला स्पर्धा, तसेच दिनांक तो पाढा इंग्रजीचे शब्द वाचन, इतर शालेय उपक्रम शाळेत राबविले जातात.


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकाससुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानुषंगाने मुलांची तयारी करून घेतल्या जाते आणि त्याकरिता विद्यार्थ्यांबरोबर पालकसुद्धा प्रतिसाद देत आहेत.
- दिनेश ठाकरे, मुख्याध्यापक


दिनेश ठाकरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्र शाळा देगाव कॉन्व्हेंटच्या तुलनेचे शिक्षण आमच्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे गावातील पालकांचा या शाळेकडे ओढा वाढला आहे.
- गणेश कोगदे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, देगाव.

 

 

Web Title: Increase in number of students in Degaon School due to innovative activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.