शेती पिकांचा चुकीचा सर्व्हे करणे भोवले
By Admin | Updated: August 21, 2014 00:40 IST2014-08-21T00:40:12+5:302014-08-21T00:40:12+5:30
नदीपासून तब्बल २ किलोमीटरच्या अंतरावर शेत असलेल्या शेतकर्यांची पात्र लाभार्थींच्या यादीत नियमबाह्यरीत्या नावे समाविष्ट करीत तलाठय़ांनी त्यांना लाभान्वित केले.

शेती पिकांचा चुकीचा सर्व्हे करणे भोवले
आकोट : शेती पिकांच्या नुकसानीबाबत सर्व्हे करताना नदीपासून तब्बल २ किलोमीटरच्या अंतरावर शेत असलेल्या शेतकर्यांची पात्र लाभार्थींच्या यादीत नियमबाह्यरीत्या नावे समाविष्ट करीत तलाठय़ांनी त्यांना लाभान्वित केले. त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवीत हनवाडी (पारळा) येथील तलाठी आर. व्ही. बोकाडे यांना निलंबित करण्यात आले. एसडीओ शेलेश हिंगे यांनी निलंबनाचे आदेश काढले असून, बोकाडे यांना चुकीचा सर्व्हे करणे चांगलेच भोवले आहे. हनवाडी (पारळा) येथे पुरामुळे नदीकाठावरील शेती खरवडून गेली होती. नुकसानग्रस्त शेती पिकांचा सर्व्हे करत असताना तलाठी बोकाडे यांनी पात्र लाभार्थींना डावलून नदीपासून अंतरावर दोन किलोमीटर शेत असलेल्या २९ शेतकर्यांना ५0 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या यादीत समाविष्ट केले होते. या प्रकाराबाबत पात्र लाभार्थींनी जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली होती. तसेच विधानसभेतसुद्धा लाभार्थींच्या बोगस यादीची चौकशी करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर मंत्रालयातून निघालेल्या चौकशीच्या आदेशावरून आकोटचे नायब तहसीलदार गीते व मंडळ अधिकारी एन. डी. पवार यांनी जंगल नकाशाच्या आधारे पूरग्रस्त शेतीची संयुक्त पाहणी केली. यामध्ये तलाठी बोकाडे यांनी अधिकाराचा दुरुपयोग करीत पात्र लाभार्थींना वंचित ठेवून बोगस सर्व्हे केला असल्याचे समोर आले. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत मुख्यालयी गैरहजर राहणे, कार्यालयाने दिलेल्या कारणे दाखवा नोटीसचे स्पष्टीकरण न करणे, ग्रामसभा न घेता राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीमध्ये मनमानी करीत नावे समाविष्ट करणे यासह विविध आक्षेपीय मुद्यांच्या आधारे तलाठी बोकाडे यांना चौकशीअंती निलंबित करण्याचे आदेश एसडीओ शैलेश हिंगे यांनी दिले.