अकोला जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, पिके मातिमोल; बळीराजाचं मोठं नुकसान
By रवी दामोदर | Updated: February 27, 2024 16:18 IST2024-02-27T16:18:06+5:302024-02-27T16:18:14+5:30
१४ मि.मी. पाऊस बरसला : गहू, हरभऱ्यासह फळबागांना फटका

अकोला जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, पिके मातिमोल; बळीराजाचं मोठं नुकसान
अकोला : जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने सोमवारी मध्यरात्री हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिके ऐन सोंगणीला आले असताना अवकाळी पावसामुळे गहू, हरभऱ्यासह लिंबू व इतर फळबाग पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात गत २४ तासात १४ मि.मी. पाऊस बरसला असून, त्यामध्ये तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूरसह बार्शीटाकळी तालुक्यात धुव्वाधार पाऊस झाला.
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री वादळवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे रब्बी पिके मातीमोल झाले आहेत.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
अतिवृष्टी व पीक विम्याचे पैसे मिळणे बाकी असताना आता शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामातील पिकांचा तत्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
जिल्ह्याचा येलो अलर्ट कायम
नागपूर हवामान विभागाच्यावतीने जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. दि.२८ व २९ फेब्रुवारीनंतर पुन्हा मार्च महिन्याच्या सुरुवातीला १ मार्च ते २ मार्च रोजी येलो अलर्ट कायम आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बार्शीटाकळी तालुक्यात पक्षांचा मृत्यू
बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात गारपीट झाल्याने गहू व हरभरा जमिनदोस्त झाला आहे. दरम्यान गारपीटीमुळे निहीदा, लखमापूर, सावरखेड परिसरात पक्षांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.