दारूची अवैध विक्री, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:13 IST2021-02-05T06:13:40+5:302021-02-05T06:13:40+5:30
कुंभारी येथे रक्तदान शिबिर उत्साहात कुंभारी : कुंभारी येथील विशाखा बौद्ध विहारात सोमवारी नागेश सिरसाट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे ...

दारूची अवैध विक्री, दोघांना अटक
कुंभारी येथे रक्तदान शिबिर उत्साहात
कुंभारी : कुंभारी येथील विशाखा बौद्ध विहारात सोमवारी नागेश सिरसाट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुलताने होते. अतिथी म्हणून सभापती चंद्रशेखर पांडे, दिनकर खंडारे, शेख साबीर, नितीन किर्तक, विलास जगताप, सचिन सिरसाट, जाकीर शहा होते. संचालन भन्ते सत्यशील यांनी तर आभार अभिजित सिरसाट यांनी मानले.
रेणुका धानोरकारचे परीक्षेत सुयश
हाता : येथील युवा मंचाने घेतलेल्या परीक्षेत रेणुका धानोरकार हिने प्रथम क्रमांक पटकावला. २३ जानेवारी रोजी थोर पुरुषांच्या जीवनावर आधारित परीक्षा घेण्यात आली. २६ जानेवारीला निकाल घोषित करण्यात आला.
शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी
तेल्हारा : शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी अभिजित चतारे, शहराध्यक्षपदी सौरभ खारोडे, उपाध्यक्ष कैलास अवताडे, किरण साळुंके, गौरव धुळे, कार्याध्यक्ष रवी चिंचोळकर, सचिन तायडे, सचिव भय्या देशमुख, गजानन बोडे, शिवा अमृतकर आदींची निवड करण्यात आली.
दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण
अकोट : राज्य कौशल विकास सोसायटीमार्फत दिव्यांग व्यक्तींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी गुगल लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा व दिलेल्या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी. माहितीसाठी समाजकल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
ऑनलाइन आनापान शिबिर
पातूर : तुळसाबाई कावल विद्यालयात ऑनलाइन आनापान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पातूर येथील भन्ते बी. संघपाल, नांदखेड येथील जगन्नाथ गवई यांच्या मार्गदर्शनात ५ ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होते. शिबिरात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
घुसरवाडी येथे तानाजी मालुसरे पुण्यतिथी
म्हातोडी : घुसरवाडी येथे नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी कार्यक्रमाचे तानाजी मालुसरे व्यायामशाळा व ग्रामस्थ मंडळीतर्फे ४ फेब्रुवारी रोजी दुपारी आयोजन केले आहे. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच संत गजानन महाराजांचे पूजन करण्यात येणार आहे.
अनभोरा येथे धम्मकुटीला आग
मूर्तिजापूर : तालुक्यातील अनभोरा येथे धम्मकुटीला मंगळवारी सायंकाळी अचानक आग लागली. आगीत भन्ते यांचे साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती मिळताच, अनभोरा गावातील नागरिकांनी धम्मकुटीकडे धाव घेतली आणि पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली.
कौलखेड ते वडद रस्त्याची दुरवस्था
आपातापा : परिसरात मील कौलखेड गाेमाशे फाटा ते वडद गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील माल आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पल्लवी चिंचोळकर हिचे सुयश
अकोट : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बीएड उन्हाळी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सावित्रीबाई फुले शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी पल्लवी चिंचोळकर हिने घवघवीत यश प्राप्त करीत नववे स्थान प्राप्त केले. तिच्या यशाबद्दल प्राचार्या डॉ. एस.पी. सावजी व प्राध्यापकांनी कौतुक केले.
शाैचालय नसल्याने ग्रामस्थांची कुचंबणा
अडगाव : गावात सार्वजनिक शौचालय नसल्याने, ग्रामस्थांसह गावात येणाऱ्या पाहुणे मंडळींची कुचंबणा होत आहे. उघड्यावर शौचास जावे लागते. गावात ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक शौचालय उभारावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नेटवर्कअभावी बँकेचे व्यवहार ठप्प
माझोड : बीएसएनएलच्या कनेक्टिव्हिटीअभावी गोरेगाव खु. येथील बँकेचे व्यवहार १५ दिवसांपासून ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. गोरेगाव येथील कॅनरा बँकेत ग्रामीण भागातील हजारो ग्राहकांची खाती आहेत. परंतु कनेक्टिव्हिटी नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत.
सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव
हिवरखेड : हिवरखेड येथील सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच काढण्यात आले. सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या ठिकाणी कोणत्याही गटाला बहुमत मिळाले नसल्याने, कोणत्या गटाच्या सदस्याची सरपंच पदी निवड होते. याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सर्वसाधारण प्रवर्गामुळे अनेकजण सरपंच पदासाठी इच्छुक आहेत.
आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
अकोट : सन २०२० व २१ चे सत्र संपण्यापूर्वी नव्या शैक्षणिक सत्राच्या आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. नव्या शाळांना नोंदणीसाठी व आरटीई प्रवेशपत्र ॲटो फॉरवर्ड करण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.