लिलाव न झालेल्या पूर्णा पात्रातून अवैध उत्खनन
By Admin | Updated: June 3, 2014 20:52 IST2014-06-03T19:17:56+5:302014-06-03T20:52:58+5:30
बाळापूर तालुक्यातील पूर्णा नदीच्यापात्रातुन लिलाव न झालेल्या पात्रातून वाळूचे अवैधरीत्या उत्खनन.

लिलाव न झालेल्या पूर्णा पात्रातून अवैध उत्खनन
बोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्यातील सोनाळा पूर्णा येथील पूर्णा नदीच्या लिलाव न झालेल्या पात्रातून लाखो रुपयांच्या वाळूचे अवैधरीत्या उत्खनन महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून केले जात आहे. या चोरीची माहिती असूनही महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
बोरगाव वैराळे, सोनाळा व अंदुरा भाग २ हे पूर्णा व मोर्णा नदीमध्ये येत असलेली बाळापूर व अकोला तालुक्यातील रेती स्थळे शासनाने जाहीर केल्यानुसार हर्रास झाले नाहीत. प्रत्येक रेती स्थळावर शासकीय किमतीनुसार ५० लाख रुपयांपेक्षा अधिक रेती होती. गत आठ दिवसांपासून सोनाळा येथील पूर्णा नदीपात्रातून दररोज रात्रंदिवस अवैधरीत्या उपसा होत असून, आतापर्यंत शेकडो ट्रक रेतीची वाहतूक करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी स्थानिक तलाठ्यांकडे तक्रारी केल्या; परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अवैध उत्खनन करणार्यांचे मनोबल उंचावले आहे. ते ग्रमास्थांसोबत अरेरावीची भाषा करतात. स्थानिक अधिकार्यांकडून अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक पकडले जातात; परंतु त्यांच्यावर योग्य कारवाई होत नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याबाबत बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके यांना माहिती दिली असता त्यांनी सोनाळा ग्रामस्थांना ट्रक व अवैध रेती चोरी करणारी वाहने पकडून ठेवण्याचा सल्ला दिला. वाहने अडविल्यानंतर आम्हाला माहिती द्या व यानंतर आम्ही कारवाई करू, असे समाधान सोळंके यांनी सांगितले.