वाळूचा अवैध उपसा व चोरटी वाहतुक करणार्या वाहन मालकांना अटक व सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 23:55 IST2017-12-21T23:50:19+5:302017-12-21T23:55:05+5:30
अकोला - वाळूचा अवैधरीत्या उपसा करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करणारे चार ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर या वाहनांच्या तीन मालकांना अकोट फैल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मात्र, त्यांची लगेच जामिनावर सुटका करण्यात आली.

वाळूचा अवैध उपसा व चोरटी वाहतुक करणार्या वाहन मालकांना अटक व सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - वाळूचा अवैधरीत्या उपसा करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करणारे चार ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर या वाहनांच्या तीन मालकांना अकोट फैल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मात्र, त्यांची लगेच जामिनावर सुटका करण्यात आली.
म्हैसांग ते अकोला या मार्गावर वाळूचा अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करणार्या चार ट्रक व दोन ट्रॅक्टरवर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने घुसर ते अकोट फैलदरम्यान पाळत ठेवून कारवाई केली. यावेळी मोठी उमरी येथील रहिवासी मनीष गिरी यांच्यासह योगेश नागोराव बोपटे, प्रकाश चिंतामण वानखडे, हबीब शाह अकबर शाह मदारी, भरत चंद्रकांत नाचरू, प्रमोद अशोक वदे आणि दीपक मंगल बदराशे यांना अटक करण्यात आली होती. तब्बल २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर, आणखी पाच वाहनमालकांसह १२ जणांविरुद्ध विशेष पथक आणि महसूल विभागाने अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अकोट फैल पोलिसांनी ठाणेदारांना अंधारात ठेवत वाहनमालकांची नावे वगळत वाहनचालकांवर कारवाई केली. मात्र, त्यानंतर गुरुवारी तीन वाहनमालकांना अटक केली असून, यामध्ये अमीद रहेमान खान, सै. आरीफ सै. इसाक आणि सुभाष गावंडे यांचा समावेश आहे. त्यांची गुरुवारीच जामिनावर सुटका करण्यात आली.
अकोट फैल पोलीस ठाण्यात ही तक्रार आल्यानंतर पोलीस कर्मचारी व नाईट ऑफीसरच्या तांत्रिक चुकीमुळे १२ पैकी केवळ ७ नावे तक्रारीत टाकण्यात आली होती. मात्र, त्याच तक्रारीत खालील रकान्यात १२ नावे समाविष्ट आहेत. १२ आरोपींची नावे असलेली प्रत न्यायालयात सादर करण्यात आली आहे. केवळ चुकीने हा प्रकार घडला असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
- उमेश माने पाटील
शहर पोलीस उपअधीक्षक, अकोला.