सिबिलचा गुणांकन ७२० पेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांना पीक कर्ज नाही
By राजेश शेगोकार | Updated: April 5, 2023 17:22 IST2023-04-05T17:21:45+5:302023-04-05T17:22:07+5:30
‘मेरा गाव, मेरी संसद’ : शेतकरी जागर मंचचा गावागावात जागर, शेतकऱ्यांना खरीप किंवा रबी या दोन्ही हंगामांत पीक कर्जामुळे आर्थिक मदत होत असते. मात्र, आता सिबिलमुळे पीक कर्ज घेणे अडचणीचे ठरणार आहे

सिबिलचा गुणांकन ७२० पेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांना पीक कर्ज नाही
अकाेला - पीक कर्जासाठी आता सिबिलची जाचक अट पुढे करण्यात आली असून, या अटीमुळे ९० टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार आहे. सिबिलचा गुणांकन ७२० पेक्षा कमी असल्यास कर्ज मिळत नाही याची कारणे जाणून न घेता सरसकट शेतकऱ्याना वेठीस धरणे चुकीचे असून यासंदर्भात जनजागृतीसाठी शेतकरी जागर मंच जिल्हाभरात ‘मेरा गाव, मेरी संसद’ अभियान राबवित आहे. १ मे कामगारदिनी शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांनी दिली.
शेतकऱ्यांना खरीप किंवा रबी या दोन्ही हंगामांत पीक कर्जामुळे आर्थिक मदत होत असते. मात्र, आता सिबिलमुळे पीक कर्ज घेणे अडचणीचे ठरणार आहे. आता शासनाने सिबिलचे भूत आणल्याने सिबिलच्या गुणांकनामध्ये अंदाजे ९० टक्के शेतकरी पीक कर्जासाठी अपात्र ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कर्जाअभावी पुन्हा शेतकरी आत्महत्येकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सिबिल अट त्वरित रद्द करण्यात यावी, अन्यथा शेतकरी जागर मंचच्या वतीने कामगार दिनी आंदोलन करण्यात येणर आहे
सिबिलसंदर्भात मुर्तीजापूर तालुक्यातील १५० च्या वर गावांमध्ये जनजागृती करण्याला सुरुवात झाली आहे. सिबिलचा गुणांकन ७२० पेक्षा कमी असल्यास कर्ज मिळत नाही. त्याची मुख्य कारणे म्हणजे कर्जात नियमित हप्ते न भरणे, वन टाइम सेटलमेंट जमादार असलेल्या कर्जदाराने कर्ज न भरणे, डिफॉल्टर होणे, यापूर्वी कधी कर्ज न घेतल्यास, परतफेड केलेल्या कर्जाची माहिती बँकेने सिबिल (क्रेडिट ब्युरो) ला न दिल्यास, क्रेडिट कार्डची लिमिट वारंवार वापरत असल्यास गुण कमी होतात. शेतकरी जागर मंचाच्या वतीने तालुक्यातील कवठा या गावांमध्ये जनजागृती करून आंदोलनाला सुरुवात केली आहे, यावेळी जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, अरुण बोंडे, श्रीकृष्ण बोळे, वासुदेवराव बोळे, राजू वानखडे, रामचंद्र तायडे, अरविंद तायडे, राम कोरडे, भावसुंदर वानखडे, सुधाकर गौरखेडे, मंगेश कुकडे आदी उपस्थित होते.