वर्हाडातील भक्तांना ‘सव’च्या मूर्तींंची भुरळ
By Admin | Updated: August 25, 2014 02:23 IST2014-08-25T02:03:21+5:302014-08-25T02:23:54+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील गणेश भक्तांचा उत्साह शिगेला : गणेश उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात.

वर्हाडातील भक्तांना ‘सव’च्या मूर्तींंची भुरळ
हर्षनंदन वाघ / बुलडाणा
जागतिक पातळीवर पोहचलेल्या गणेश उत्सव महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. अशा उत्साही वर्हाडातील गणेशभक्तांना बुलडाणा तालुक्यातील सव येथील गणेशमूर्तींंनी भुरळ घातली आहे.
जागतिक पातळीवर पोहचलेल्या गणेशोत्सवाला जगात सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या ३१ उत्सवामध्ये स्थान मिळाले आहे. पुणे- मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये मोठय़ा प्रमाणात साजरा होणार्या गणेश उत्सवाने राज्यातील इतर भागासह देशातील काही शहरांमध्ये लोकप्रियता मिळविली आहे. स्वातंत्र्यापूर्वी जनमानसाला संघटित करण्याच्या हेतूने लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप स्वातंत्र्यानंतर भव्यदिव्य झाले आहे. मूर्ती बनविणारे कारागीर मूर्तींंवर अंतिम हात फिरवित असून, किमती वाढल्या असल्या तरी गणेशभक्तांचा उत्साह कायम दिसून येत आहे.
येणार्या काही दिवसात मूर्तींंच्या विक्रीत वाढ होणार असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसणार आहे; मात्र काही भागात पाऊस कमी असल्याने ग्रामीण भागात उत्साह कमी दिसून येत आहे.
**गणेश मंडळांची संख्या वाढणार
मागील वर्षी जिल्ह्यात सार्वजनिक ८८१ तर एक गाव एक गणपतीची २९२ ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली होती. तर बुलडाणा शहरातील संगम चौकात रूद्र गणेश मंडळाच्या वतीने १७ फूट उंचीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. तर बुलडाणा अर्बन गणेश मंडळातर्फे अष्टविनायकाचा देखावा साकार करण्यात आला होता. यावर्षी सिद्धिविनायकाचा देखावा साकारण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यात १ हजारावर लहान-मोठय़ा गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. यावर्षी गणेश मंडळात वाढ होणार असल्याची शक्यता आहे; मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे ग्रामीण गावात निराशमय वातावरण आहे. अनेक गणेश मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
** येणार्या काळात होणारा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक ठरावा. आपल्याकडे गणेशोत्सव घराघरात साजरा होतो तसेच तो सार्वजनिक ठिकाणी एकत्रितपणे साजरा करण्याची मोठी पंरपरा आहे. या उत्सवाच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने जल, वायू आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी अहवान केले आहे.